fbpx

‘अतिथी देवो भव’ म्हणत स्वागत करा, मात्र २३ तारखेला हे पार्सल घरी पाठवा – सुप्रिया सुळे

टीम महाराष्ट्र देशा – येत्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार संघातून युतीकडून भाजपच्या उमेदवार कांचन कुल या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा लढणार आहेत. या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती येथे प्रचाराच्या शुभारंभा प्रसंगी बोलताना भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्यावर निशाणा साधला.

‘अतिथी देवो भव’ म्हणत आपण नेहमी आलेल्या पाहुण्यांचं स्वागतच करतो पाहुण्यांनी यावं, रहावं. मात्र २३ तारखेला हे पार्सल आपापल्या घरी पाठवायचे आहे हे काम आपल्याला करायचं आहे. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी कांचन कुल यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

‘बारामती सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते. म्हणून तर ती बारामती आहे. ‘अतिथी देवो भव’ म्हणत आपण नेहमी आलेल्या पाहुण्यांचं स्वागतच करतो पाहुण्यांनी यावं, रहावं आपण त्यांचं सगळं करू मात्र २३ तारखेला हे पार्सल आपापल्या घरी पाठवायचे आहे हे काम आपल्याला करायचं आहे. देशात फक्त एकाच मतदार संघाची चर्चा आहे ती म्हणजे बारामती. जे चांगलं असत तेच हवंहवंस असतं. एखादी साधारण गोष्ट कोणाला हवी असते का ? ही आपल्यासाठी मोठी कॉम्पलीमेंट आहे. आज सगळेजण बारामती बारामतीचा जप करतात मला असे वाटते यातच आपल्या सगळ्याच यश आहे. ५० वर्ष कार्यकर्त्यांनी जे सहकार्य केलं आहे त्याचीच पोचपावती आहे. जो पाहुणा बारामतीत येतो तो आपलं यश पाहूनच जातो. असच चांगलं काम आपण करत राहू.

विशेष म्हणजे खा. सुप्रिया सुळे आणि रासप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या दोन्ही उमेदवार खुद्द बारामतीच्या असल्याने या लढतीत विशेष रंगत पाहायला मिळणार आहे. परंतु बारामती मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा म्हणजेच सुप्रिया सुळे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे कांचन कुल यांना ही लढाई काहीशी जड जाणार आहे.