नुकसानीची भरपाई `डेरा सच्चा’च्या मालमत्तेतून करा

नवी दिल्ली : `डेरा सच्चा’चे प्रमुख बाबा गुरमीत राम रहिम सिंग यांच्या समर्थकांकडून करण्यात आलेल्या नुकसानीची भरपाई सिंग यांच्या मालमत्तेतून करावी, असा महत्त्वपूर्ण आदेश पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने आज दिला.

सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानी प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. मुख्य न्यायाधीश एस. सिंग सरोन, न्या. अवनीश झिंगन व न्या. सूर्या कांत यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. पंचकुला भागात दीड लाखांहून अधिक लोकांनी जमावबंदीचे आदेश डावलून प्रवेश केल्याप्रकरणी स्थानिकांनी जनहित याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी झाली.

कोणत्याही परिस्थितीत पंजाब, हरियाणा व आजूबाजूच्या राज्यातील कायदा-सुव्यवस्था कायम राखावी. कोणत्याही राजकीय नेते किंवा मंत्र्याने अधिका-यांच्या कामात हस्तक्षेप न करण्याचे सक्त आदेशही न्यायालयाने सरकारला दिले. या पुढील सुनावणी उद्या पुन्हा होणार असल्याची माहिती केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सत्यपाल जैन यांनी सांगितले.