सेहवागने पंजाबच्या संघाची उडवली खिल्ली; म्हणाला, ‘बाळाचे डायपर्सही इतक्या वेळा बदलत नाहीत…’

सेहवागने पंजाबच्या संघाची उडवली खिल्ली; म्हणाला, ‘बाळाचे डायपर्सही इतक्या वेळा बदलत नाहीत…’

virendra sehwag

दुबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या सत्राची धमाकेदार सुरुवात झाली आहे. भारतातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा १४ व हंगाम अर्ध्यावर स्थगित करण्यात आला होता. आता हा हंगाम युएईमध्ये पूर्ण केला जात आहे. काल पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा अत्यंत रंजक असा सामना पाहायला मिळाला. राजस्थानने पहिली फलंदाजी करून १८५ धावांचा डोंगर उभा केला.

यानंतर पंजाबने देखील चांगली खेळी करत सामना जिंकण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या २ षटकांमध्ये या सामन्याने कलाटणी घेतली आणि राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला. दरम्यान, या रंजक सामन्यानंतर पंजाबवर नेटकऱ्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. तर, भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने देखील पंजाबच्या संघावर खोचक टिपण्णी केली आहे.

‘बाळाचे डायपर्सही इतक्या वेळा बदलत नाहीत, जितक्या वेळा पंजाब किंग्ज त्यांच्या संघातले खेळाडू बदलतात’, असं सेहवाग म्हणाला आहे. ‘पंजाब किंग्जचे सामन्यासाठीचे अंतिम ११ खेळाडू कोणते असतील, याचा अंदाज बांधणं फारच कठीण आहे. कारण पहिल्या ७ सामन्यांमध्ये त्यांनी त्यांची गोलंदाजांची फळी इतक्या वेळा बदलली आहे की त्याला सुमारच नाही. ते कसा खेळ करतात आणि कुणासोबत खेळतात हे पंजाब किंग्जसाठी मोठं आव्हान ठरणार आहे,’ असा इशारा वजा सल्ला देखील सेहवागने संघाला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या