पहा कसा होणार ‘पिफ’चा महोत्सव

टीम महाराष्ट्र देशा : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने दरवर्षी पुण्यात होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘पिफ’ यावर्षी ९ ते १६ जानेवारी, २०२०मध्ये होणार आहे. या कार्यकमाची माहिती पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या चित्रपट महोत्सवाच्या नोंदणी प्रक्रियेची माहिती www.piffindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ९ डिसेंबर (आजपासून) या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीस सुरुवात झाली आहे. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्यांना मिळालेल्या नोंदणी क्रमांकासह लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, आयनॉक्स, बंड गार्डन रस्ता व पीव्हीआर पॅव्हेलियन, सेनापती बापट रस्ता या ठिकाणी २ जानेवारी, २०२० पासून सकाळी १० ते सायं ७ दरम्यान स्पॉट रजिस्ट्रेशन करता येईल. १८ वर्षे पूर्ण असलेले विद्यार्थी, ‘फिल्म क्लब’चे सभासद व ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांपुढील) यांना ओळखपत्र दाखवून रु. ६०० मध्ये नोंदणी करता येईल तर इतर इच्छुकांसाठी नोंदणी शुल्क हे रु. ८०० इतके आहे.

याही वर्षी महोत्सवामध्ये चित्रपटांचे अनेक विभाग असणार आहेत. त्यामेध्य स्पर्धात्मक विभाग, इतर विभागामध्ये स्टुडण्ट कॉम्पिटिशन, MITSFT इंटरनॅशनल स्टुडण्ट कॉम्पिटिशन, ग्लोबल सिनेमा, थीम सेक्शन (महाराष्ट्राचा हिरक महोत्सव), इंडियन सिनेमा, आणि ट्रिब्युट हे विभाग आहेत. तर यावर्षी नवीन उपक्रम म्हणून कंट्री फोकस या विभागात ‘युनायटेड किंग्डम’ मधील चित्रपट, लघुपट दाखविण्यात येतील. सोबतच ओपनिंग, अवॉर्डीज्, ट्रायबल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन रेट्रोस्पेक्टिव्ह, कॅलिडोस्कोप यांचा देखील समावेश आहे.

या महोत्सवामध्ये ‘द बाफ्टा शॉर्ट्स २०१९’ या लघुपट मालिकेत ब्रिटीश समाजाची विविधता दर्शविणा-या कथांचा समावेश आहे. याबरोबरच ब्रिटीश काउंसिल व ग्रीरसन ट्रस्टच्या वतीने ब्रिटनमधील सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी दिला जाणारा ‘ब्रिटीश डॉक्युमेंट्री पुरस्कार’ प्राप्त माहितीपट हे देखील ‘आर्ट्स अॅण्ड कल्चर’ या विभागात दाखविले जातील.

‘सिंहावलोकन’ या विभागात देशातील नावाजलेले चित्रपट दिग्दर्शक व लेखक ऋषिकेश मुखर्जी यांचे चित्रपट दाखविण्यात येतील. याचबरोबरच हे वर्ष फेडरिको फेलिनी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे त्यानिमित्ताने एक महान व प्रभावी चित्रपट निर्माता म्हणून जागतिक प्रसिद्धी मिळालेले इटलीचे फेडरिको फेलिनी यांचे चित्रपट देखील महोत्सवामध्ये दाखविले जातील.

महत्वाच्या बातम्या