Facebook- फेसबुकवरील प्रोफाईल फोटोला सुरक्षा कवच

फेसबुकच्या युजर्ससाठी प्रोफाईल फोटो ही बाब खूप महत्वाची आहे. ही प्रत्येक युजर्सची ओळख असते. फेसबुकवर प्रोफाईल फोटोला अन्य युजर्सने शेअर करणे, डाऊनलोड करणे, कॉमेंट करणे आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. मात्र काही युजर्सला त्यातही विशेष करून महिलांना आपल्या प्रोफाईलवरील प्रतिमेचा गैरवापर होऊ नये अशी अपेक्षा असते. या पार्श्‍वभूमिवर फेसबुकने आज भारतीय महिला युजर्सला एक सुरक्षा प्रणाली प्रदान करण्याची घोषणा केली आहे. याच्या अंतर्गत फोटो गार्ड फॉर प्रोफाईल इमेजेस आणि डिझाईन ग्रीड फॉर पिक्चर्स हे दोन फिचर देण्यात आले.

फोटो गार्ड फॉर प्रोफाईल इमेजेसच्या अंतर्गत आता फेसबुकच्या युजर्सला त्यांच्या प्रोफाईल प्रतिमेच्या सेटींगमध्ये बदल करण्याची मुभा देण्यात आली आहे. ही प्रणाली सेंटर फॉर सोशल रिसर्च, लर्नींग लिंक्स फाऊंडेशन, ब्रेकथ्रू आणि युथ की आवाज या संस्थांच्या मदतीने विकसित करण्यात आली असून तिला विविध पातळ्यांवरून वापरता येते. यात प्रोफाईल पीक्चर गार्ड देण्यात आले आहे. हे कार्यान्वित केल्यानंतर तीन प्रकारे प्रोफाईल प्रतिमांचे संरक्षक होते. एक तर अन्य लोक त्या युजरचे प्रोफाईल पीक्चर डाऊनलोड वा शेअर करू शकत नाही. दुसरे म्हणजे फक्त त्याच्या मित्रांच्या यादीतील युजर्सच त्याच्या प्रोफाईल पीकवर टॅग करू शकतात. आणि संबंधीत प्रोफाईल फोटो सुरक्षित असल्याचे चिन्ह यावर दिलेले असेल. या प्रणालीस अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी युजरला त्याच्या प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करून प्रोफाईल पिक्चर कार्ड हे फिचर कार्यान्वित करावे लागेल.

यासोबत फेसबुकने डिझाईन ग्रीड फॉर पिक्चर्स या फिचरच्या माध्यमातून भारतीय युजर्सला त्यांच्या प्रोफाईल प्रतिमेवर डिझाईन लावण्याची सुविधा देण्यात आली आहे. विख्यात डिझायनर जेसिका सिंग यांच्या डिझाईन्सचा यासाठी वापर करण्यात आला आहे. कुण्याही युजरच्या प्रतिमेवर डिझाईन असल्यास फोटोशॉपसह अन्य सॉफ्टवेअर्सचा वापर करून ते मॉर्फ करणे कठीण असते. यामुळे जेसिका सिंग यांच्या विविध डिझाईन्स (उदा. पाऊस, फुले, नक्षीदार डिझाईन्स आदी) लावल्यामुळे याचा गैरवापर टाळता येणार आहे. अर्थात यामुळे प्रोफाईल प्रतिमेचा स्क्रीनशॉट घेणेही अवघड होणार आहे. २७ जूनपासून भारतीय महिला युजर्सला हे दोन्ही फिचर्स प्रदान करण्यात येणार आहेत.

 

खालील व्हिडीओत पहा फेसबुकच्या प्रोफाईलच्या सुरक्षाविषयक ताज्या फिचरची प्राथमिक माहिती

You might also like
Comments
Loading...