पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस आणि शिवसेनेत शीतयुद्ध सुरु आहे. एका बाजूला हे दोन पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत असताना, आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेत देखील संघर्ष सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रभाग रचानांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने खूप मोठ्या प्रमाणात मोडतोड केली आहे, असा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांनी केला आहे.
नाना भानगिरे म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम काम करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेस पक्ष चांगल्या प्रकारे सरकार चालवण्यासाठी मदत करत आहे. कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या नियमात राज्यात शिवसेना हा मोठा पक्ष आहे, तरीदेखील पुणे शहरात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष हे भेदभाव करतात, असा आरोप भानगिरे यांनी केला आहे.
हडपसर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक प्रभागांमध्ये राष्ट्रवादीने प्रभाग रचनेत मोठी मोडतोड केली आहे. ज्या प्रभागात शिवसेनेची प्रचंड ताकद आहे, अशा प्रभागात जाणीवपूर्वक प्रभाग तोडण्याचे काम शहराध्यक्ष व हडपसर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी केले आहे. शिवसेनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता, त्यांनी हा कार्यक्रम केला आहे. मांजर दूध चोरून पिते असे त्यांना वाटत असेल तर बाळासाहेबांचा शिवसैनिक कधीही घाबरणार नाही. प्रभाग तोडायचे आहे तर तोडा, सर्वात जास्त नगरसेवक निवडून आणण्याची आमच्या धमक आहे. मैत्री केली तर प्रामाणिकपणे करा, असा सणसणीत टोला शिवसेना नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.
दरम्यान पुण्यातील प्रभाग रचनेवर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला अनुकूल अशी प्रभाग रचना करण्यात आली असल्याचे विरोधकांकडून टीका केली जाते. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील काही प्रभागांमध्ये किरकोळ बदल करण्यात आले आहे. असे असले तरी प्रभाग रचनेवर सर्वांची सहमती आणि समाधान होत नसल्याचे चित्र पुण्यात दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :