कला-साहित्याला दुय्यम स्थान देणारा समाज कालांतराने लोप पावतो : जयंत पाटील

blank

पुणे : समाजात वावरत असताना ‘विवेक’ अस्तित्वात आहे की नाही, हा प्रश्न मला पडतो. साहित्य आणि कलेची ज्या ज्या ठिकाणी जोपासना होते तिथे विवेक नांदतो. जोपर्यंत राजकारणी साहित्य आणि कलेचा आदर करणार नाहीत, तोपर्यंत समाजात विवेक रूजणार नाही, असे मत राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित १९ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या प्रसंगी ते बोलत होते.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित या दोन दिवसीय संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी या संमेलनाचे अध्यक्ष संत साहित्य आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, विचारवंत आणि लेखक डॉ. रामचंद्र देखणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल, साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीप बराटे, रमेश गरवारे ट्रस्टचे संचालक डॉ.राजपाठक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संमेलनाच्या स्मरणिकेचे आणि डॉ. राजेंद्र थोरात लिखित ‘वारकरी संतदर्शन’ या पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी जयंत पाटील म्हणाले की, भौतिकवादाचा पाठपुरावा करणारा आणि कला-साहित्याला दुय्यम स्थान देणारा समाज कालांतराने लोप पावतो, हा इतिहास आहे. आज विविध प्रश्नांनी देश पेटून उठलेला असताना महाराष्ट्र तुलनेने शांत आहे, याचे श्रेय साहित्य आणि कलेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समाजात रुजलेल्या विवेकाला द्यावे लागेल. कला आणि साहित्याची जोपासना करणे, हे समाजातील प्रत्येक घटकाचे आद्य कर्तव्य आहे. त्याच कर्तव्याला जागत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध असून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल.

आज मुंबईत आपण मराठीतून कोणी संवाद साधल्यास समोरची व्यक्ती आपल्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहते. या पार्श्वभूमीवर साहित्य-संस्कृतीचे माहेरघर लावल्या जाणाऱ्या पुण्याकडून लोकांच्या अपेक्षा खूप उंचावल्या आहेत. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसमोर अनेक प्रश्न असताना संपूर्ण देशातून विस्थापीतांचे थवेच्या थवे येऊन धडकत आहेत. मराठी माणसाची वसई, विरार आणि अगदी तळेगाव पर्यंत पिछेहाट झाली आहे. तीच परिस्थिती पुण्याच्या मराठी माणसाची होऊ नये, तो विस्थापीत होणार नाही या दृष्टीने आगामी 20 वर्षांचा कालावधी लक्षात घेता धोरणात्मक रचना करून ध्येयधोरणे आखली पाहिजेत.

या संमेलनाचे अध्यक्षपद नम्रपणे स्वीकारत, हा माझा ज्ञानिया-तुकोबाचा वंश आहे, असे सांगून डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले की, लोकसाहित्य, लोककला यांचा समन्वय साधणारा मी समन्वयक प्रतिनिधी आहे. मी साहित्य आणि कला दिंडीचा वारकरी आहे. संस्कृती नामक घराचे कला हे पुढचे अंगण आहे, तर शब्दसाहित्य हे मागचे अंगण आहे. इथे मागच्या अंगणात साहित्य बागडते, तर पुढच्या अंगणात कला फुलत असते. मानवी मनाला आनंद देणे हे साहित्य आणि केलेचे प्रयोजन आहे.