उच्च न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब, आता सत्य बाहेर येईल- दरेकर

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशाला आव्हान देणारी याचिका अनिल देशमुख आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी अनिल देशमुख आणि राज्य सरकारवर टीका केलीय.

सर्वोच्च न्यायालय ही याचिका फेटाळणार असल्याचा अंदाज आम्ही आधीच व्यक्त केला होता. मात्र, आता या प्रकरणाची सविस्तर चौकशी होईल आणि सत्य समोर येईल, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने तत्कालीन गृह मंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी आपली बाजू ऐकूनच घेतली नसल्याचे सांगत देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच सीबीआयकडून होऊ घातलेली चौकशी थांबवण्याची मागणी देखील केली होती.

मात्र, या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या याच निर्णयामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, आता त्यांच्यामागे सीबीआय चौकशीचा फेरा लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या