गोंधळात गोंधळ : मुंबई-पुण्यात शाळा बंदच, तर उर्वरित राज्याबाबत संभ्रम कायम

school

पुणे : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतर राज्यभरात शाळा सुरु करण्यासाठी लगबग सुरु झाली होती. राज्य सरकारकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली होती.

मात्र, दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसत असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच, येत्या दोन महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंसह स्थानिक प्रशासनाने अधिक काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. त्यामुळे वाढत्या धोक्यात शाळा सुरु होणार का असा प्रश्न पुन्हा निर्माण झाल्याने संभ्रम वाढत आहे.

राज्यात उद्यापासून (दि. २३ नोव्हेंबर) शाळा सुरु करण्यात याव्यात असे आदेश राज्य सरकारने दिले. मात्र, यापूर्वी शाळा पूर्णपणे निर्जंतुकीकरण व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात याव्यात अशी नियमावली देखील जाहीर करण्यात आली. तर, शाळेत विद्यार्थ्यांना पाठवण्यासाठी पालकांचे संमतीपत्र देखील मागण्यात आले.

काही जिल्ह्यांत शिक्षकच कोरोनाबाधित आढळल्यानंतर पालकांपुढे पाल्याच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला. याचदरम्यान, मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी, महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी घेतला.

तर,  पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. त्या’नुसार १३ डिसेंबरला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. पालकांशी चर्चा करुन आणि कोरोना संसर्ग स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे,’ असे स्पष्ट करण्यात आले आहे.

केवळ ३० टक्के पालकांनीच संमतीपत्र दिल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात देखील खबरदारीचा पर्याय म्हणून ३० नोव्हेंबरपर्यंत शाळा बंदच राहणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

दरम्यान, शैक्षणिक संस्थेतील नववी ते बारावीचेचे वर्ग सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच निर्णय घ्यावा असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निर्देश दिल्याने याबाबत अधिक संभ्रमात वाढली आहे. मुंबई, पुण्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकांनी घेतला असला तरी ग्रामीण भागांसह इतर जिल्ह्यातील व शहरातील शाळा सुरु करण्याबाबत एक दिवस राहिला असताना कोणतीही स्पष्टता झालेली दिसत नाही. त्यामुळे गोंधळात गोंधळ अशी काहीशी स्थिती निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP