नगर जिल्ह्यात शाळा इमारती कोसळण्याचे सत्र सुरूच

अहमदनगर : निंबोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या 5 वी च्या वर्गाचे छत कोसळून तीन विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना ताजी असतानांच आज (बुधवारी पहाटे) श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या तीन वर्ग खोल्यांची इमारत कोसळली.मात्र पहाटेच्या वेळी ही घटना घडल्याने शाळेत कोणीही नसल्यानेच एक मोठी दुर्घटना टळली आहे.

घारगाव येथील शाळेच्या नवीन इमारतीचे काम तातडीने सुरू करावे,या मागणीसाठी घारगावच्या संतप्त ग्रामस्थांनी दौंड-नगर रस्त्यावर बुधवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले.तसेच नवीन इमारत होईपर्यंत शाळा अन्यत्र भरविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत खूप जुनी झालेली आहे.सदरच्या शाळेकरिता नवीन इमारत बांधावी,अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती.निंबोडी येथे शाळेच्या इमारतीचे छत कोसळून 3 विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यु व अनेक विद्यार्थी जखमी झाल्याच्या पाश्र्वभूमीवर घारगाव मध्ये जिल्हा परिषद शाळेच्या स्थितीवरून चिंता व्यक्त केली जात होती.त्यादरम्यान बुधवारी पहाटे अचानक शाळेच्या तीन वर्ग खोल्यांची इमारत कोसळली.सुदैवाने ही घटना पहाटेच्या वेळी घडल्यानेे शाळेत कोणीही उपस्थित नव्हते.त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

दरम्यान, नगर जिल्ह्यात शाळा इमारती कोसळण्याचे सत्र सुरूच असल्याचे घारगाव च्या घटनेवरून दिसून आले आहे. मंगळवारी कर्जत तालुक्यातील सिध्दटेक पासून जवळच असलेल्या बेंर्डी नंबर 1 या गावातील आंगणवाडीच्या इमारतीची भिंत कोसळली.मात्र आंगणवाडी सेविका छाया भोसले यांनी या घटनेपूर्वीच खबरदरी म्हणून आंगणवाडी शाळा जवळच असलेल्या जिल्हा परिषद साळेच्या पडवीत भरविली होती.त्यामुळे त्यांच्या सतर्कतेने सुदैवाने या घटनेत काही ही अनर्थ घडला नाही.गेली 3-4 वर्षे सदरची आंगणवाडी ची इमारत धोकादायक असूनही दुरूस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते.

निंबोडी च्या दुर्घटने नंतर आंगणवाडी सेविका भोसले यांनी सतर्कतेने शाळा दुसरीकडे भरविल्याने मोठी दुर्घटना टळली.त्यानंतर आता बुधवारी पहाटेच्या वेळी घारगाव येथील शाळेची इमारत कोसळली आहे. शाळा इमारती कोसळण्याच्या या घटने नंतर हादरलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यात विविध शाळांमधील धोकादायक असलेल्या तब्बल 204 शाळा खोल्यांचा वापर तातडीने बंद करण्याचा आदेश दिला आहे.

या खोल्यांचा वापर बंद करून पर्यायी जागेचा शोध घेऊन तेथे तातडीने शाळांचे वर्ग सुरू करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.दरम्यान प्रशासनाने सर्व गटशिक्षणाधिकारी यांना धोकादायक शाळा तसेच खोल्यांची पाहाणी करून अहवाल तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत.नगर जिल्ह्यात जवळपास 434 शाळाखोल्या धोकादायक स्थितीत असल्याची माहिती मिळाली असून त्या पाडण्याचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे आलेले आहेत.त्यापैकी 230 शाळा खोल्या पाडण्यात आल्या असून अद्यापही 204 खोल्या पाडण्याचे काम बाकी आहे.