स्कूल बस शुल्कवाढविरोधात पालकांची हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव

पुणे  – इंदिरा नॅशनल स्कूलच्या काही विद्यार्थ्यांना स्कूल बसचे वाढीव शुल्क न भरल्याने स्कूल बसमध्ये घेण्यास नकार देण्यात आला. मात्र, स्कूल बसच्या शुल्कात केलेली वाढ नियमबाह्य आहे, असे सांगत पालकांनी याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. इंदिरा नॅशनल स्कूल ही सीबीएसई बोर्डाची शाळा आहे. स्कूलने मागील वर्षी एप्रिल 2017 मध्ये स्कूल बसच्या दरात 15 टक्क्यांनी वाढ केली.

मात्र ही वाढ नियमबाह्य आहे, अशी भूमिका घेत पालकांनी वाढीव शुल्क भरण्यास नकार दिला. तेव्हापासून स्कूलचे मुख्याध्यापक, सीबीएसई बोर्ड, एनसीटीसीआर (नॅशनल काऊंसिल फॉर चिल्ड्रेन राईट्स) यांच्याकडे पालकांनी पत्रव्यवहार करून ही अतिरिक्त वाढ रद्द करावी, अशी मागणी लावून धरली आहे. मात्र, यापैकी कोणाकडूनही पालकांच्या मागणीची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. तसेच ईटीपीसीची (एक्सिक्यूटिव पॅरेन्ट्स कमिटी) मान्यता घेतल्याशिवाय स्कूल बसचे दर वाढवता येत नाही, असा नियम आहे.

मात्र, हा नियम मोडून ही वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती पालक मीरा दिलीप यांनी दिली. त्यामुळे आज ज्या पालकांनी वाढीव शुल्क भरलेले नाही. त्या विद्यार्थ्यांना स्कूलबसमध्ये घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पालक शाळेच्या या निर्णयाविरोधात आक्रमक होऊन त्यांनी अखेर हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. याप्रकरणी शाळेच्या कर्मचा-यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.