मुंबईत टोइंगमध्ये घोटाळा: मुख्यमंत्र्यांच्या जवळचे IAS दराडें यांची चौकशी करा – संजय निरुपम

मुंबई : विदर्भ इन्फोटेक लिमिटेड कंपनी ही नागपूरची असून यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रविण दराडे यांचा जवळचा संबध आहे, असा संशय येत आहे कारण प्रविण दराडे जिथे जिथे जातात त्या त्या विभागाचे काम या कंपनीला मिळते, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली.

मुंबईमध्ये सुमारे ९ ते ९.५ लाख चारचाकी आहेत तसेच सुमारे १७ लाख मोटारसायकल आहेत. गेल्या काही महिन्यानपासून संपूर्ण महिनाभर मुंबईत विदर्भ इन्फोटेक लिमिटेड कंपनीच्या ८० हायड्रोलिक मशीनच्या टोविंग व्हॅन फिरत आहेत. ते नो पार्किंगची गाडी तात्काळ हायड्रोलिक मशीन वापरून उचलत आहेत. यापूर्वी मुंबई वाहतूक पोलिस १०० ते १५० रुपये दंड आकारायचे. परंतु आत्तदर ४३० % ने वाढवले आहेत. चारचाकीसाठी ६६० रुपये आणि मोटारसायकलसाठी ४२६ एवढे झालेले आहेत. चारचाकी दंडामध्ये २०० रुपये मुंबई वाहतूक पोलीस म्हणजेच सरकारला मिळतात आणि ४०० रुपये विदर्भ इन्फोटेक लिमिटेड कंपनीला मिळतात आणि ६० रुपये जीएसटी लावला जातो. मोटारसायकल दंडामध्ये हि असेच आहे, २०० रुपये सरकारला आणि २०० रुपये विदर्भ इन्फोटेक लिमिटेड कंपनीला मिळतात आणि २६ रुपये जीएसटी लागतो. याचाच अर्थ विदर्भ इन्फोटेक लिमिटेड कंपनीला खूप मोठा फायदा यामधून मिळत आहे..

ते पुढे म्हणाले की भाजपचे सरकार आल्यापासून आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून या कंपनीला सरकारची अनेक कामे मिळालेली आहेत. हि कंपनी software आणि hardware तसेच programming मध्ये कार्यरत असून त्यांना टोविंगचा काहीच अनुभव नाही तरी देखील मुंबईतील सर्वं टोविंगचे काम त्यांना देण्यात आलेले आहे. या कंपनीचे मालक प्रशांत उगेमुगे आणि प्रविण दराडे यांचा काही तरी संबध असावा याचा दाट संशय निर्माण होत आहे आणि प्रविण दराडे हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत लाडके आहेत. भारतातील ते एकमेव आयएयस अधिकारी असतील ज्यांना निवृत्त होईपर्यंत मलबार हिलचा बंगला दिला गेलेला आहे, अशी घटना कधीच घडलेली नसल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे.

विदर्भ इन्फोटेक लिमिटेड कंपनीला वरळीच्या मुंबई वाहतूक पोलिस कार्यालयामध्ये १००० क्षेत्रफळ असणारी जागा फुकटात का देण्यात आली ? त्याचे विजेचे बिलही मुंबई वाहतूक पोलिस भरत आहेत. एवढी मेहेरबानी सरकार का करत आहे ? असा सवाल संजय निरुपम यांनी उपस्थित केला आहे.

You might also like
Comments
Loading...