जनतेच्या पैश्यातून स्वतःचे पुतळे उभारणाऱ्या मायावतींना न्यायालयाचा दणका

टीम महाराष्ट्र देशा- देशभरात पुतळे आणि स्मारकांवरून मोठ्या प्रमाणावर राजकारण होत असताना बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांना सर्वोच्च न्यायालयानं जोरदार दणका दिला आहे. मायावती यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात स्मारकं आणि पुतळे उभारण्यावर खर्च केलेले जनतेचे सर्व पैसे परत करावेत, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

उत्तर प्रदेशात सत्ता असताना मायावती यांनी अनेक शहरांत त्यांच्या पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तीचे व स्वत:चे पुतळे उभारले होते. यावरून त्यावेळी देखील मोठं गदारोळ निर्माण झाला होता. स्वतःचेच पुतळे उभा केल्याने देशभरातून मायावती यांच्यावर टीका झाली होती.

मायावती सरकारकडून पुतळ्यांवर करण्यात आलेल्या खर्चाला आक्षेप घेत २००९ साली एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. सुमारे दहा वर्षांनंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठापुढं आज त्यावर सुनावणी झाली. पुतळ्यांवर करण्यात आलेला हा खर्च न्यायालयानं प्रथमदर्शनी अयोग्य ठरवला आहे. मायावती यांना हा खर्च भरून द्यावा लागेल, असं परखड मत खंडपीठानं मांडलं.