एसबीआय बँकेत मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची मर्यादा कमी होण्याची शक्यता!

sbi

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय स्टेट बँकेच्या खातेदारांना लवकरच खुश खबर मिळण्याची शक्यता आहे. एसबीआय मध्ये खाते असलेल्यांसाठी आता आपल्या खात्यामध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची मर्यादा कमी होण्याची शक्यता आहे. सध्या बँक खात्यात ३ हजार रुपये मिनिमम बॅलेन्स ठेवणे बंधनकारक आहे. ती रक्कम १ हजार रुपयांपर्यंत कमी केली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
बँकांकडून खात्यावर किमान रक्कम ठेवण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये ३ हजार, लहान शहरांमध्ये २ हजार तर ग्रामीण भागात १ हजार रुपयांची मर्यादा आहे. बँकेकडून खात्यावर महिन्याला सरासरी शिल्लक आणि सहा महिन्यांसाठी शिल्लक रकमेच्या नियमांमध्येही बदल केले जाण्याची शक्यता आहे. बँकेच्या अहवालानूसार एप्रिल ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत खात्यावर किमान शिल्लक नसल्याचे कारणाने १,७७२ कोटी रुपयांचा दंड जमा झाला आहे.

यासंदर्भात बँकेकडून अद्याप अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेने अशा प्रकारच्या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो याची तपासणी केली होती. त्यामुळे SBI कडून खात्यावरील किमान रक्कमेसंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.