द्वितीय सत्रातील परीक्षेबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मोठी घोषणा

savitribai fule

पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे स्थिती अत्यंत बिकट बनली असून आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत आहेत. देशात सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्णांच्या जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा हा अव्वल आहे. यामुळेच, पुण्यात राज्य सरकारच्या नियमावलीनुसार कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

यातच आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील सत्र परीक्षांबाबत महत्वाची घोषणा केली आहे. दुसऱ्या सत्राची परीक्षा ही जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून परीक्षेच्या तयारीला सुरुवात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील कुलगुरुंची ऑनलाईन बैठक घेतली होती. त्या बैठकीनंतर कोरोना विषाणू संसर्गामुळं राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येतील, असा निर्णय त्यांनी जाहीर केला होता.

याच पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडून सध्या २०२०-२१ मधील प्रथम सत्राच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. या परीक्षा १५ मे पर्यंत संपणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाकडून जून महिन्यात दुसऱ्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल, अशी शक्यता आहे. प्रथम सत्राची परीक्षा संपल्यानंतर दुसऱ्या सत्राचं वेळापत्रक जाहीर होईल, अशी माहिती आहे. मे महिन्यातील अखेरच्या काही दिवसांमध्ये परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर होऊ शकते.

दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनसाठी पंतप्रधान मोदींवरील दबाव वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही गरज पडल्यास लॉकडाऊन करावा, अशी सूचना केली आहे. मात्र, त्यापूर्वी दुर्बल घटकांची योग्यप्रकारे सोय करावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

महत्वाच्या बातम्या