सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११३ वा पदवीप्रदान समारंभ उत्साहात साजरा

डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी दिला विद्यार्थ्यांना "आयुष्याच्या विद्यापीठात” यशस्वी होण्याचा मूलमंत्र

पुणे : ज्या देशामधील उच्चशिक्षित मनुष्यबळ सुखासीन आयुष्याच्या शोधामध्ये परदेशांत जाते, तेथे सकारात्मकता, नावीन्यपूर्णता व संरचनात्मकतेस वाव देणारे वातावरण निर्माण करुन या देशातील तरुणवर्ग येथेच कार्यरत ठेवणे, हे आपल्यापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे, असे मत देशाच्या परराष्ट्र विभागातील सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११३ व्या पदवीप्रदान समारंभास मुख्य आतिथी म्हणून मुळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. मुळे यांनी यावेळी त्यांच्या ओघवत्या शैलीत दीक्षांत भाषण करताना विद्यार्थ्यांना “आयुष्याच्या विद्यापीठात” यशस्वी होण्याचा मूलमंत्र दिला. या पदवीप्रदान समारंभास कुलगुरू प्रा. नितीन करमळकर, प्र. कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्यासह सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाते, विद्या परिषद सदस्य, अधिसभा सदस्यदेखील उपस्थित होते.

“स्वत:ची अस्सलता जपा, कायम कुतुहल जपा, स्वत:च तुम्हाला हवा असणारा बदल व्हा, नेतृत्व करण्यासाठी सक्षम व्हा आणि मनामध्ये सतत करुणाभाव जागृत ठेवा,” अशी यशाची पंचसूत्री डॉ. मुळे यांनी यावेळी विद्यार्थ्यांसमोर मांडली.

“तुम्ही नावीन्यपूर्ण पद्धतीने विचार करु शकत असाल; तर भारतामध्येही उद्योगसाम्राज्ये उभारता येणे शक्य आहे, याचे फ्लिपकार्ट हे उत्कृष्ट उदाहरण आहे. तेव्हा आपल्याला हवा असलेला बदल हा आपणच घडवायचा आहे. आपले जग हे मुख्यत: नेतृत्व करणाऱ्या आणि अनुयायित्व पत्करणाऱ्या अशा दोन मुख्य गटांमध्ये विभागले गेले आहे. यांपैकी कोणत्या गटामध्ये जायचे हे तुम्ही ठरवायचे आहे. यशासाठी योग्य संधी यायची वाट पाहू नका. कारणी तशी ती कधी येणारच नाही. उपनिषदांमध्ये म्हटल्याप्रमाणे ’उठा, जागृत व्हा आणि ध्येयपूर्ती झाल्याखेरीज थांबू नका,” असा प्रेरणादायी संदेश मुळे यांनी यावेळी दिला.

विद्यापीठाच्या या ११३ व्या पदवीदान समारंभावेळी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी मुळे यांचे औपचारिक स्वागत केले. यानंतर कुलगुरुंनी विद्यापीठाचे उल्लेखनीय यश व विविध योजनांचा आढावा घेत विद्यार्थ्यांना संबोधित केले.

“भारतातील उच्च शैक्षणिक विश्वामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आदर्श विद्याकेंद्र म्हणून उदय होतो आहे. जगामधील जटिल आव्हाने समजावून घेऊन त्यावर उपाययोजना करु शकणारे भविष्यातील नेतृत्व व विचारवंत येथे तयार व्हावेत, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. पारंपारिक व व्यावसायिक मूल्यांवर आधारलेले ज्ञान आणि अनुभावाधारित प्रत्यक्ष शिक्षण यांची योग्य सांगड घालणारे शिक्षणाचे प्रारूप तयार करणे हे आमचे ध्येय आहे. समाजासाठी हे नक्कीच मोठे योगदान आहे,” अशी भूमिका कुलगुरूंनी यावेळी विद्यार्थ्यांस संबोधित करताना मांडली.