वाया जाणारे अन्‍न वाचविण्यासाठी आता मंगल कार्यालयात फलक !

save wasted food

लातूर : खोट्या प्रतिष्ठेसाठी वाया घालवल्या जाणा-या अन्नाची बचत करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ लातूर सिटीच्या पदाधिका-यांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी शहरातील मंगल कार्यालय-हॉटेलमधील अन्न वाया न घालवण्याचे आवाहन करणारे फलक लावण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य अधिकारी महेशकुमार मेघमाळे यांच्या हस्ते करण्यात आला. लातूर शहरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असलेल्या संजय क्वालिटी हॉटेलमध्ये मेघमाळे यांच्या हस्ते ‘उतनाही लो थाली में, व्यर्थ न जाये नाली में ‘ अशा आशयाच्या फलकाचे अनावरण करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ लातूर सिटीचे सदस्य रवी सौदागर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्याच सौजन्याने हा उपक्रम राबवला जाणार आहे. यावेळी रोटरी क्लब ऑफ लातूर सिटीचे अध्यक्ष दिग्विजय काथवटे, सचिव रो. सुनील देशपांडे, माजी अध्यक्ष शिवराज लोखंडे, सुधीर बाजुळगे, राजू कुलकर्णी, महेश कापसे, राजेंद्र इटकर, पुरुषोत्तम देशमुख, रवी सौदागर, सुनील चामे, मुरारी चामे उपस्थित होते. यावेळी महेशकुमार मेघमाळे यांनी रोटरी क्लब ऑफ लातूर सिटीच्या या अभिनव उपक्रमाचे कौतूक केले. अशा प्रकारच्या उपक्रमांसाठी सामाजिक संघटनांनीही पुढे यायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यात रोटरीने आपले वेगळेपण कायम ठेवले आहे. अशा सामाजिक संघटनेसोबत मिळून आपणास कार्य करायला निश्चित आवडेल, असे सांगून त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही समाजोपयोगी विविध उपक्रम राबविले जातात. अशा प्रकारचे उपक्रम संयुक्तरित्या राबवण्यास आपल्याला आवडेल असेही त्यांनी बोलून दाखवले. लातूर शहरातील सर्व हॉटेल्स, मंगल कार्यालयांत अशा आशयाचे फलक लावण्यात येणार आहे. एका सर्व्हेक्षणानुसार भारतामध्ये कार्यक्रम-समारंभांच्या माध्यमातून एवढे अन्न वाया जाते की, साधारण दररोज दहा लाख लोक त्यात पोटभर जेवू शकतात. जेवताना ताटात अन्न शिल्लक ठेवणे आजघडीला प्रतिष्ठेचे मानले जाते. हा समज सुजाण समजल्या जाणा-या सुशिक्षितांतही आढळून येतो.