‘स्वत:साठी घर बांधण्यापेक्षा लोकांचे जीव वाचवा’, प्रियंका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

नवी दिल्ली : सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा भाग असलेल्या पंतप्रधान निवासस्थानाचे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. लॉकडाऊनसारख्या निर्बंधामुळे बांधकामात अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने केंद्र सरकारने सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश केला आहे. पंतप्रधान भवनांसह इतर इमारतींच्या या प्रकल्पासाठी तब्बल १३ हजार ४५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सुमारे ४६ हजार लोक या प्रकल्पावर काम करत आहेत.

मात्र, यावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी टीका केली आहे. ‘देशात लोक ऑक्सिजनचा पुरवठा, लस, ऑक्सिजन बेड्स, औषधे मिळवण्यासाठी झगडत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पंतप्रधान भवन बनवण्यासाठी १३,००० कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा, आपली सर्व ताकद लोकांचे जीव वाचवण्यासाठी वापरायला हवी’, असं त्या ट्विटमध्ये म्हणाल्यात.

विरोधी पक्षांकडून, माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून या प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे. पण हा विरोध झुगारून एका निश्चित वेळेत नवे संसद भवन व इतर इमारतींचे कार्य पूर्ण करण्यासाठी सरकार जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १० डिसेंबर रोजी नव्या संसद भवनाचे भूमिपूजन केले होते. या प्रकल्पांतर्गत पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत कार्य पूर्ण होणाऱ्या इमारतींमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या