‘महात्मा गांधींच्या हत्ये प्रकरणात सावरकरांचा बचाव करण्यात आला’

sawarkar

टीम महाराष्ट्र देशा : महात्मा गांधी यांच्या हत्येत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव झाकण्यात आले आहे, असे वादग्रस्त वक्तव्य महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले आहे. हे वक्तव्य तुषार गांधी यांनी सावरकरांच्या जन्मभूमीत म्हणजे नाशिकमध्ये केले आहे. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटणार असल्याचं दिसत आहे. नाशिकच्या परशुराम सायखेडकर सभागृहात डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत ‘महात्मा गांधी से गौरी लंकेश तक, राजकीय हत्याओ का सनातन सत्य’ या विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, महात्मा गांधींच्या हत्येत जी प्रणाली वापरण्यात आली, तशीच डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या वेळीही वापरली गेली. तसेच महात्मा गांधींच्या हत्येचा तपास नीट झाला नाही. त्यामुळे त्याचा तपास परत करण्यात यावा अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. तसेच नथुराम गोडसे काही विचारांचा बळी ठरला होता. त्याचा बचाव केला गेला नाही, मात्र सावरकरांचा बचाव करण्यात आला. महात्मा गांधीच्या हत्येच्या कटात सावरकरांचा सहभागाची नोंद कपूर कमिशनच्या अहवालात आहे. गांधींच्या हत्येचा तपास नीट झाला नसून त्याचा तपास परत करण्यात यावा, अशी याचिका गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टात दाखल झाल्याची माहिती तुषार गांधींनी दिली.

दरम्यान भारत-पकिस्तानची फाळणी झाली, त्यावेळी महात्मा गांधींना विचारलंही नव्हतं. महात्मा गांधींचा फक्त बळी दिला गेला, असंही तुषार गांधी म्हणाले. नथुरामला हत्यार देणाऱ्यांना का सोडलं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मात्र तुषार गांधी यांच्या या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.