fbpx

पक्षीय आदेश मिळाल्यास लोकसभा निवडणूक लढणार – सत्यजित तांबे पाटील

अहमदनगर/ भागवत दाभाडे : युवक कॉंग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी नगर दक्षिण मतदार संघातून आगामी लोकसभेत निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. सोशल मिडीया साईट ट्विटर वरील #ट्विटरकट्टा या उपक्रमात सत्यजित तांबे सहभागी झाले होते. या उपक्रमाचे हे ३५ वे सत्र होते. ट्विटरकट्टा हा ट्विटरवरील एक लोकप्रिय उपक्रम असून या उपक्रमात राजकीय, सामाजिक, मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना सामान्य व्यक्ती थेट प्रश्न विचारतात. या उपक्रमात तांबे सहभागी झाले होते.

आपण लोकसभा निवडणूक लढणार का ? आपण ती लढावी अस मला वाटत, आपल्या सारख्या सुशिक्षित व्यक्तीला संधी नक्कीच मिळाली पाहिजे असा प्रश्न ट्वीट करत एका युजरने याबाबत विचारले असता या प्रश्नास उत्तर देताना सत्यजित तांबे ”पक्षीय आदेश मिळाल्यास लोकसभा लढणार” असल्याचे सांगितले. एका युजरने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस एकत्र आले तरी आगामी निवडणुकीत आपण थांबणार का? हा प्रश्न विचारला असता पक्षादेश जो असेल तो पाळावा असे उत्तर दिले.

सध्या नगर दक्षिण मतदार संघातून डॉ.सुजय विखे हे निवडणुकीच्या तयारीत आहेत. त्यांचा पक्ष अद्याप ठरला नसून महिना भरा पूर्वीच अहमदनगर दक्षिण मतदार संघात जर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संधी मिळाली तर खासदारकी लढविण्यास तयार असल्याचे सांगत प्रसाद शुगरचे अध्यक्ष तथा राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी थेट विखेंचे मनसुबे उधळून लावण्याचेच सुतोवाच केले होते. यात आता सत्यजित तांबे यांच्याही नावाची भर पडली आहे.