तरच कांग्रेसला पुन्हा सुगीचे दिवस येतील, भाच्याचे मामला खरमरीत पत्र

satyajeet tambe balasaheb thorat

अहमदनगर : महाविकास आघाडीत कॉंग्रेसला मनाचे स्थान मिळत नसल्याने आधीच पक्षात धुसफूस सुरु आहे. त्यात आता काँगेस पक्षात राज्यात खांदेपालटाची चर्चा सुरू असतानाच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आपले मामा व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहिले आहे. विविध सरकारी समित्यांमध्ये युवक कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. या युवकांना प्रोत्साहन देऊन काम केले तर पक्षाला पुन्हा सुगीचे दिवस येतील, असा उपाय तांबे यांनी सुचविला आहे.

प्रदेशाध्यक्ष थोरात आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेल्या पात्रात तांबे यांनी म्हटले आहे की, राज्यातील बारा जिल्ह्यांत काँग्रेसचे पालकमंत्री आहेत तर अन्य ठिकाणी पक्षाने संपर्क मंत्री नेमले आहेत. या सर्वाना आम्ही पूर्वीच युवक काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या याद्या दिल्या आहेत. मंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळी त्यांना सहभागी करून घ्यावे, हा उद्देश आहे. सध्या जिल्हा आणि तालुकास्तरावर विविध सरकारी समित्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्यातही युवक कार्यकर्त्यांना पुरेसे स्थान मिळत नाही, असे दिसते. वास्तविक पाहता २०१९ च्या निवडणुकीत युवक कार्यकर्त्यांनी खूप कष्ट केले आहेत. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेत. सध्या करोना संकटकाळातही युवक कार्यकर्ते लोकांच्या मदतीला धावत आहेत. स्वखर्चाने मदत करीत आहेत. रक्तदानाचा उपक्रम घेऊन सोळा हजार बाटल्या संकलित करण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.

राजेश टोपे आक्रमक, रात्री 2 वाजता हॉस्पिटलवर धाड टाकून केली थेट कारवाई

निष्ठेने व नेटाने काम करणाऱ्या अशा युवक कार्यकर्त्यांना वरिष्ठांच्या शाबासकीची गरज आहे. या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले, समित्यांमध्ये स्थान देऊन कामाची संधी दिली तर काँगेस पक्षाला पुन्हा सुगीचे दिवस येतील, असेही तांबे यांनी म्हटले आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालून पालकमंत्री आणि संपर्क मंत्री यांना सूचना द्याव्यात, अशी मागणीही तांबे यांनी केली आहे.

छगन भुजबळ अॅक्शन मोडमध्ये, ३२२ रेशन दुकानांचे परवाने केले रद्द