अहो महाजन ! तुम्हाला नाचायला व हसायला सुचतंच कसं ?

blank

टीम महाराष्ट्र देशा : पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, यामध्येच सांगलीतील ब्राम्हणाळ येथे बोट उलटून 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोल्हापूर सांगलीतील चित्र सामान्य नागरिकांचे ह्रदय पिळवटून टाकत आहे, दुसरीकडे मात्र राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांची माणुसकी आटली की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केल्यानंतर आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे पुराची पाहणी करत आहेत. महाजन हे बोटीत स्वार होऊन कोल्हापूर सांगलीच्या भागामध्ये फिरत आहेत, यावेळी महाजन यांच्या समवेत बोटीमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने सेल्फीसाठी मोबाईल उंचावला, तर महाजन हे हसत सेल्फी देत होते. गिरीश महाजन यांच्या सेल्फीचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यामुळे राज्यातील मंत्री किती असंवेदनशील बनले आहेत, हा प्रश्न उपस्थित होत आहे. आता यावर गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.

महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी यावरूनच गिरीश महाजन यांना चांगलच फैलावर घेतलं आहे. २५ पेक्षा जास्त लोकं मृत्युमुखी , हजारो विस्थापीत व अब्जो रुपयांचे नुकसान झाल्यावरही तुम्हाला नाचायला व हसायला सुचतंच कसं ? हा तर असंवेदनशीलतेचा कळसच झाला अशी टीका तांबे यांनी केली आहे.

दरम्यान, सर्वस्व गमावलेल्या लोकांच्या डोळ्यात अश्रूंचे थेंब असताना, घटनास्थळी भेट देण्याची उशीरा अक्कल सुचलेले मंत्री तेथे जाऊन गप्पा मारत दात काढत होते. सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ही वेळ आली असताना अशाप्रकारे दात काढून पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे मंत्री करत आहेत ! अशी जोरदार टीका कॉंग्रेसने केली आहे.

तर दुसरीकडे महापूर पाहणीवेळी मंत्री गिरीश महाजन आणि अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू, सेल्फीसाठी पोझ. पुराची पाहणी करण्यासाठी गेले आहेत की पर्यटनासाठी? सत्ताधाऱ्यांना काही संवेदना उरल्या आहेत की नाही ? मुख्यमंत्री साहेब या असंवेदनशील मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या,अधिकाऱ्यांचे निलंबन करा. अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी केली आहे.

सामान्य नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकलेला असताना गिरीश महाजन यांची बॉडी लँग्वेज चुकीची असून, मुख्यमंत्र्यांनी गंभीर मंत्र्याला पाठवलं असतं, तर बरं झालं असतं, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

राज्यकर्त्यांच्या मनाला पाझर का फुटत नाही ? – अमोल कोल्हे

राज्यात नव्याने वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यास केंद्र सरकारची मंजुरी : गिरीश महाजन

कॉंग्रेस म्हणजे वादळात भरकटलेलं जहाज : गिरीश महाजन