सत्तार म्हणतात… खासदार इम्तियाज जलील यांना निवडून आणण्याचा पापाचा मी ही भागीदार!

Abdul Sattar

औरंगाबाद : महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापवले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शहरात तुतारी वाजवून उपहासात्मक स्वागत करणार असल्याची घोषणा खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. त्याला उत्तर देतांना महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदारांवर चांगले तोंडसुख घेतले. इतकेच नाही तर त्यांना निवडून आणण्याचा पापाचा मी देखील भागीदार असल्याची कबूलीच त्यांनी माध्यमांसमोर दिली.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शहरात येत आहेत. गेल्या वेळी एमआयएमने पालकमंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवले होते. त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे या वेळी काळे झेंडे नाही तर उपहासात्मक तुतारी वाजवून स्वागत करणार असल्याचे खासदारांनी जाहीर केले आहे. त्यावरुन शिवसेनेचे मंत्री सत्तार यांनी खासदारांवर टीका केली आहे.

आमचेच पाप आमच्यावर उलटत असेल तर शेवटचा तथास्तू मंत्र आमच्याकडे आहे. त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांना कधी घरी पाठवायचे आणि कसे पाठवायाचे याची व्यवस्था केली जाईल, अशा स्पष्ट इशाराही सत्तार यांनी दिला आहे. मागे पाच वर्ष इम्तियाज जलील आमदार होते. आताही अडीच वर्षांपासून ते खासदार आहेत. इतकेच नाही तर औरंगाबाद महानगर पालिकेच्या सभागृहात एमआयएमचे २५ नगरसेवक होते. त्यांच्या वार्डाची स्थिती अत्यंत खराब असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला. आगामी निवडणुकीमध्ये खासदार इम्तियाज जलील यांना जनताच हिशोब विचारणार असल्याचे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या