कोल्हापूरच्या प्रचारात नसलेल्या सतेज पाटलांचा मुंबईत जोरदार प्रचार

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर लोकसभा मतदार संघात आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार न करणारे कॉंग्रेस आमदार सतेज पाटील हे पुण्यात आणि मुंबईतील आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात हजेरी लावत आहेत. मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या प्रचारात सतेज पाटील हे चांगलेच सक्रिय झाले आहेत. तर दुसरीकडे मावळ मतदारसंघामध्ये पुतणे ऋतुराज पाटील हे पार्थ पवार यांचा प्रचार करत आहेत.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघात सतेज पाटील यांनी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचार कार्यात सहभाग घेतला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दोघांच्या मनोमिलनाचा प्रयत्न केला. मात्र सतेज पाटलांनी त्यांचंही ऐकलं नाही. मात्र आता सतेज पाटील हे कोल्हापुरातली कमी मिलिंद देवरा यांच्या प्रचारात भरून काढत आहेत. तर दुसरीकडे ऋतुराज पाटील हे पार्थ पवार यांच्या प्रचार रॅलीमध्ये जोरदार प्रचार करत आहेत.

Loading...

नेमका काय आहे महाडिक – पाटील वाद

सतेज उर्फ बंटी पाटील हे कॉंग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार आहेत तर धनंजय उर्फ मुन्ना महाडिक हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार आहेत. खरतर यांच्यातील वादाला सुरुवात झाली ती २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून, या निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पाठिंबा मागितला होता. सतेज पाटील यांनीही महाडिकांना मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि जोरदार प्रचार करत दिलेलं आश्वासन पाळलं देखील, त्यामुळे मोदी लाटेतही धनंजय महाडिक खासदार म्हणून निवडून आले. या निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या विजयात सतेज पाटलांच्या सिंहाचा वाट होता.

लोकसभेनंतर विधानसभेत आघाडीत बिघाडी झाली त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने वेग-वेगळ लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सतेज पाटील आणि अमल महाडिक यांच्यात लढत झाली. अमल महाडिक हे धनंजय महाडिक यांचे चुलत भाऊ आहेत. त्यामुळे या निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांच्या विरोधात अमल महाडिक यांचा प्रचार केला. त्यामुळे सतेज पाटलांचा पराभव झाला आणि खऱ्या अर्थाने वादाला सुरुवात झाली. लोकसभेसाठी केलेल्या मदतीची जाणीव न ठेवत महाडिक यांनी आपली फसवणूक केली असा आरोप सतेज पाटलांनी केला.