सातारा , माढ्यात फक्त शिवसेनाच ; बानगुडे पाटलांना विश्वास

टीम महाराष्ट्र देशा : राज्यभरात शिवसेनेन स्वबळावर लढण्याचा इरादा पक्का केलेला दिसत असताना आता शिवसेना मोठ्या तयारीने लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागल्याच पाहायला मिळत आहे. त्यानुसारच शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार आम्ही स्थानिक पातळीवरही तयारी पूर्ण केली आहे. सातारा आणि माढा या दोन लोकसभा मतदारसंघांत शिवसेना आपला झेंडा फडकावेल, असा विश्वास कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आणि शिवसेना नेते नितीन बानगुडे-पाटील यांनी व्यक्त केला.

आगामी रणनीतीबाबत जिल्ह्यातील शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, युतीबाबत भाजपकडूनच चर्चा आहे. आम्ही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. दुसरीकडे गेल्या 15 वर्षांच्या कारभारात काँग्रेस व राष्ट्रवादीने विश्वासार्हता गमावली आहे. तर, गेल्या चार वर्षांत भाजपने चुकीचे निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांत नाराजी आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी लढणारी शिवसेना लोकांच्या आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करेल, असा विश्वास जनतेला आहे. बंगाल, तेलंगणा, मिझोराममध्ये प्रादेशिक पक्ष सत्तेवर येत असेल, तर महाराष्ट्रात शिवसेना सत्तेवर येण्यास काहीही अडचण नाही.सर्वसामान्यांच्या मनात विकासाची पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्याचे सामर्थ्य शिवसेनेत आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीचा शिलेदार म्हणून शिवसेना उभी राहू शकते. त्यामुळे सातारा व माढामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना मुसंडी मारेल.

दरम्यान, या दोन मतदारसंघात उमेदवार कोण असेल, हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे. पुण्यात झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत सातारा व माढा मतदारसंघासाठी उमेदवारांची यादी निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. या दोन मतदारसंघातील नेमके उमेदवार कोण याची राज्याला उत्सुकता लागली आहे.

You might also like
Comments
Loading...