राज्यातील सातबारा उतारे ‘क्लाऊड’वर ठेवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील सर्व गाव नमुना नंबर सातबारा व फेरफार नोंदी नागरिकांना सुरळीतपणे व विनाअडथळा मिळावेत यासाठी ही कागदपत्रे ‘क्लाऊड’वर ठेवावीत. त्यासाठी आराखडा तयार करून एक महिन्यात त्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

डिजिटल सातबारा उताऱ्यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी वरील सूचना केल्या.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड प्रकल्प महत्त्वाचा असून याअंतर्गत राज्यातील सर्व सातबारा उतारे व फेरफार नोंदी या ऑनलाईन ठेवण्यात येत आहे. हे ऑनलाईन झालेले सातबारा उतारे स्थानिक सर्व्हर व स्टेट डेटा सर्व्हरवर ठेवण्यात आले आहेत. सातबारा उताऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे हे सर्व उतारे ‘क्लाऊड’वर ठेवण्यात यावेत. यासाठी राज्य शासनाने ‘क्लाऊड’ तंत्रज्ञान वापराचे धोरण तयार केले आहे. ई फेरफार व डिजिटल सातबारा प्रकल्प सुरळीत चालण्यासाठी सर्व कागदपत्रे ही क्लाऊड तंत्रज्ञानाचा वापर करून साठविणे आवश्यक आहे. त्यासाठी ही कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यासाठी आराखडा तयार करावा.

यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री संजय राठोड, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे आदी उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...