प्रजासत्ताक दिनी सरपंचाचे उपोषण, ग्रामस्थांचा पाठिंबा

shirdhon

उस्मानाबाद : प्रजासत्ताक दिनी सगळीकडे झेंडावंदनाच्या कार्यक्रमाची रेलचेल असते. प्रशासकिय कर्मचारी, लोकप्रतिनीधी हे वेगवेगळ्या ठिकाणी आपली उपस्थिती लावून प्रजासत्ताक दिनाचे महत्व व त्याचा इतिहास सांगतात. पण याला अपवाद ठरले आहे शिराढोण येथील सरपंच पद्माकर पाटील.

काही दिवसापुर्वी पोलीस ठाण्याअंतर्गत सुरू असलेले अवैध धंदे बंद व्हावेत अशा मागणीचे निवेदन सरपंच पद्माकर पाटील यांनी पोलीस अधिक्षकांना दिले आणि अवैध धंदे बंद नाही झाले तर प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्याचा इशाराही दिला होता. यानंतर पोलीस प्रशासनाने कडक पाऊल उचलून कारवाई केली. पण तरीही अवैध धंदे छुप्या पद्धतीने सुरूच असल्याने सरपंच पाटील हे प्रजासत्ताक दिनी पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसले होते. यावेळी ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी गाव बंद ठेवून उपोषणाला पाठिंबा दिला.

दरम्यान फौजदार वैभव नेटके यांच्या आश्वासनानंतर सरपंच पद्माकर पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र अवैध धंदे सुरू राहिले तर पुन्हा आंदोलन करणार असा इशारा दिला. अखिल भारतीय भ्रष्टाचार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर यांनी उपोषणस्थळी भेट देवून आंदोलनास पाठिंबा दिला.

महत्वाच्या बातम्या