जनतेतून सरपंचाची थेट निवड; सरपंचासाठी स्वतंत्र मतपत्रिका, वाचा काय आहेत निकष.

सोलापूर : नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील २५६ ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. प्रथमच ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून थेट सरपंचाची निवड होणार आहे. यासाठी आयोगाने स्वतंत्र यंत्रणा राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरपंचपदासाठी फिकट निळ्या रंगाची तर सदस्यांसाठी वेगळ्या रंगाची मतपत्रिका असणार आहे.

याशिवाय सरपंच पदाच्या उमेदवारांसाठी स्वतंत्र मतदान यंत्र देण्यात येणार आहे. ऑक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २५६ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रभाग रचनेनंतर आता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावर सप्टेंबरपर्यंत हरकती सूचना मागवण्यात आल्या आहेत. सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

जनतेतूनसरपंच निवड केल्यानंतर नियमानुसार पहिले दोन वर्षे सरपंचावर अविश्वास ठराव आणता येणार नाही. दोन वर्षानंतर सरपंचांवरील अविश्वास ठराव नामंजूर झाल्यास पुन्हा वर्षांनी अविश्वास ठराव आणता येणार आहे. मुदत संपण्याच्या सहा महिन्यांपूर्वीही अविश्वास ठराव आणता येणार नाही. अविश्वास ठरावाच्या प्रक्रियेत बदल केला आहे. जनतेतून निवडून आलेल्या सरपंचास अधिक चांगल्या पद्धतीने कामकाज करता येण्याच्या दृष्टीने हे बदल करण्यात आले आहेत.

१९९५नंतर जन्म झालेला सरपंचपदाची निवडणूक लढवू इच्छिणारा उमेदवार हा सातवी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. आयोगाने सातवी पास वा समकक्ष अशी अट घातल्याने सातवी पासला समकक्ष काय? याचाही शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. आयोगाने दिलेल्या सर्व नियमांची काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी केली जाणार आहे. याबाबत राजकीय पक्षांची बैठकही बोलावण्यात येणार असल्याचे तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांनी सांगितले.