सरपंचांना प्रशिक्षण देऊन परीक्षा राज्यशासनच घेणार

सोलापूर- थेट जनतेतून सरपंच निवडण्याच्या निर्णयानंतर राज्यातील सुमारे साडेसात हजार सरपंचांना प्रशिक्षण देऊन परीक्षा राज्यशासन घेणार आहे. त्या परीक्षेत उत्तीर्ण सरपंचांना सह्याचे अधिकार व धनादेश मिळणार असल्याचे, आदर्श ग्राम योजनेचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांनी जाहीर केले. त्या निर्णयामुळे सरपंचांमध्ये अस्वस्थतेचे चित्र आहे.

त्यासंदर्भातील जिल्ह्यातील काही सरपंचांशी संवाद साधून त्यांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मतदारांनी घेतलेल्या लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या परीक्षेत आम्ही उत्तीर्ण झालो. मग, आणखी कशाला परीक्षा असे प्रश्न काहींनी उपस्थित केले. तर, परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी असल्याचा आत्मविश्वास काहींनी व्यक्त केला. पण, ती संख्या अगदी नगण्य आहे.

नुकतेच नगर येथील एका कार्यक्रमात बोलताना आदर्श ग्राम योजनेचे कार्याध्यक्ष पवार म्हणाले, केंद्र सरकार पंचायत राजची दिशा ठरवण्याचा अभ्यासक्रम तयार करत आहे. सरपंचांना प्रशिक्षण दिल्यास विकासकामे करण्यास मदत होईल. ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात थेट निधी मिळत असल्याने सरपंचाला महत्त्व आले. आमदारकीच्या निवडणुकांसारखी स्थिती सरपंच निवडणुकांची आहे. पूर्वी काही हजारांमध्ये होणारा निवडणूक खर्च लाखोंच्या पुढे गेला असून विकासाच्या मुद्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाबाबत पवार यांनी चिंता व्यक्त केली होती.