मंत्र्यांप्रमानेच आता सरपंचही घेणार पद आणि गोपनियतेची शपथ : पंकजा मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : सभागृहात निवडून आल्यानंतर आमदार, खासदार आणि मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली जाते. त्याच पार्श्वभूमीवर आता ग्रामपंचायतीच्या सरपंचांनाही पद आणि गोपनियतेची शपथ घ्यावी लागणार आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने हा निर्णय घेतला आहे.

याविषयी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. पंकजा मुंडे यांनी ‘थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामपंचायतबाबत असलेली बांधिलकी आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने असलेली जबाबदारी याबाबत गावातील जनतेमध्ये तसेच लोकप्रतिनिधीमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या शपथ घेण्यामागचा उद्देश असल्याचे सांगितले.

दरम्यान, पुढे बोलताना मुंडे यांनी सरपंचांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सदस्य तसेच पंचायत समितीच्या सभापती आणि सदस्य यांना देखील शपथ देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती दिली आहे.