सरदार पटेल हे असे नेते आहेत ज्यांचा मी सर्वाधिक आदर करतो- उपराष्ट्रपती

naidu

नवी दिल्ली- उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती म्हणाले की, सरदार पटेल हे असे नेते आहेत ज्यांचा मी सर्वाधिक आदर करतो.आज एका फेसबुक पोस्टमध्ये उपराष्ट्रपतींनी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेल्या महान योगदानाची आठवण करून दिली आणि देशातील नागरिकांना, विशेषत: तरुण पिढीला त्यांचे योगदान जाणून घेण्याचे आणि आधुनिक भारत घडवण्यात त्यांचे अतुलनीय योगदान कायम स्मरणात ठेवण्याचे आवाहन केले.

सरदार पटेल यांनी भारताच्या एकीकरणात बजावलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली. एका महत्वपूर्ण टप्प्यावर, सरदार पटेल यांनी आपली बुद्धिमत्ता, चातुर्य, कौशल्य, अनुभव आणि कणखरपणा यांचा भारताच्या प्रादेशिक ऐक्य आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी कसा वापर केला याचा नायडू यांनी उल्लेख केला. ते म्हणाले,सावध नियोजन, वाटाघाटी, समुपदेशन आणि कौशल्यपूर्ण हाताळणीच्या माध्यमातून त्यांनी सर्व संस्थानांना आधुनिक इतिहासाच्या सर्वात मोठ्या कामगिरीमध्ये एकत्र आणले.

अखिल भारतीय नागरी सेवा निर्मितीचा उल्लेख करताना उपराष्ट्रपती म्हणाले की हे सरदार पटेल यांनी दिलेले हे आणखी एक उल्लेखनीय योगदान आहे. ते म्हणाले की, पटेल यांनी या सेवांची भारताची पोलादी चौकट म्हणून कल्पना केली होती जी देशाच्या एकता आणि अखंडतेचे रक्षण करेल. ते म्हणाले, पटेल यांनी सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशासनातील भागीदार मानले आणि त्यांनी अखंडता आणि प्रामाणिकपणाचे उच्च मापदंड राखले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

देशाच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने अंतर्गत स्थैर्य कायम राखले त्याबद्दल पटेल यांना लोहपुरुष म्हणून गौरवण्यात आले असे उपराष्ट्रपतींनी नमूद केले.

सरदार पटेल यांचे काही महान गुण अधोरेखित करताना उपराष्ट्रपती म्हणाले, मातृभूमीप्रति त्यांचे प्रेम, नेतृत्वगुण, साधेपणा, प्रामाणिकपणा, विनम्रता, जटिल समस्या सोडवण्याचा व्यावहारिक दृष्टीकोन, ऐहिक चातुर्य, शिस्त आणि संघटन कौशल्य हे प्रत्येक भारतीयासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल. त्यांनी सरदार पटेल यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने एकत्र काम करण्याचे आवाहन केले.

उपराष्ट्रपती म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवन आणि त्यांच्या योगदानाविषयी प्रत्येक बालकाला परिचित करण्याची माझी उत्कट इच्छा आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरी सेवकाने त्यांची भाषणे वाचली पाहिजेत आणि प्रत्येक राजकीय नेत्याने अखंडता, दृढता आणि जनहित केंद्रस्थानी ठेवण्याचे त्यांचे महान गुण आत्मसात केले पाहिजेत.

महत्वाच्या बातम्या