सारंगखेड्याचे नाव जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणू- मुख्यमंत्री

नंदुरबार : सारंगखेडा येथील 400 वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असणारा यात्रोत्सव आणि येथील अश्व प्रदर्शन सोहळ्याचे पर्यटनदृष्ट्या अनोखे महत्व आहे. या सोहळ्याला शासनाचे पाठबळ देवून जगाच्या पर्यटन नकाशावर आणण्यासाठी आगामी काळात सर्वतोपरी प्रयत्न करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, चेतक फेस्टिव्हलला आंतरराष्ट्रीय स्वरुप देण्याचा मंत्री श्री. रावल यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या प्रयत्नाला शासनाचे पूर्ण पाठबळ आहे. काळाच्या ओघात अडचणीत आलेली आदिवासी संस्कृती ही प्राचीन व समृद्धी संस्कृती असून या संस्कृतीचे पुनरूज्जीवन करुन संवर्धन करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याठिकाणी आयोजित पर्यटन परिषदेनिमित्त पर्यटन क्षेत्रातील अनेक व्यावसायिक आले आहेत. त्यांच्या माध्यमातून सारंगखेडा परिसरात पर्यटकांना आणण्यासाठी निश्चितच मदत होईल. राजस्थानमधील पुष्कर व गुजरातमधील कच्छ महोत्सवाप्रमाणे सारंगखेड्याचा चेतक महोत्सव आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्यासाठी सर्वंकष मदत केली जाईल.

जगभरात पर्यटनाला मोठा वाव आहे. पर्यटनामुळे सामाजिक अभिसरण होवून एकतेची भावना निर्माण होते. याशिवाय व्यवसायाला चालना मिळून रोजगार निर्मितीही होते. जगभरात सर्वाधिक रोजगार निर्मितीचे क्षेत्र म्हणून पर्यटन व्यवसायाकडे पाहिले जाते. पर्यटनाच्या निर्मित्त येणारा पर्यटक हा त्या ठिकाणच्या सर्व घटकांना रोजगाराची संधी देवून जातो. नंदुरबार जिल्ह्यातही पर्यटनाला मोठा वाव आहे. येथील निसर्ग संपदा, पर्वतराजी, दुथडी भरुन असलेले तापी नदीचे पात्र, निसर्गरम्य तोरणमाळ अशा पर्यटनस्थळांमुळे सारंगखेडा, प्रकाशा आणि तोरणमाळ दरम्यान पर्यटन सर्किट विकसित करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

सौर ऊर्जेच्या माध्यमातून तेथे ऊर्जा पोहोचविण्यास तांत्रिक मर्यादा आहेत. तथापि, प्रत्येक पाड्यापर्यंत वीज पोहोचविण्यास शासन कटिबद्ध आहे. तापी काठालगतच्या गावांमध्ये शेतीसाठी उपसा सिंचन योजना त्वरेने कार्यान्वित करण्यासाठी तसेच सुलवाडे- जामफळ या प्रकल्पांचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नद्यांवरील पुलांना बंधाऱ्यांचे स्वरुप देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन ताकदीने पाठिशी उभे आहे. कुपोषणाचे निर्मूलन करुन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करण्याच्या दिशेने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून त्यांनी गौरविण्यात आलेल्या मान्यवरांच्या कार्याचा यथोचित गौरव केला.

टुरिस्ट कॉन्क्लेव्ह

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, टुरिस्ट कॉन्क्लेव्ह सारंगखेडा परिसरातील पर्यटन वाढीसाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळून अर्थव्यवस्था वृद्धिंगत होईल. त्यासाठी पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यात येतील. आगामी काळात सारंगखेडा, प्रकाशा आणि तोरणमाळ येथे पर्यटकांची संख्या वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.