भाजप-संभाजी ब्रिगेड युतीची चर्चा; संतोष शिंदे म्हणाले, ‘वैचारिक लढा चालूच राहील,परंतु…’

भाजप-संभाजी ब्रिगेड युतीची चर्चा; संतोष शिंदे म्हणाले, ‘वैचारिक लढा चालूच राहील,परंतु…’

संभाजी ब्रिगेड

मुंबई – मराठा सेवासंघ ३२व्या वर्षात पदार्पण करत असताना आता संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवासंघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या वक्तव्याने एका चर्चेला तोंड फोडलं आहे. संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या तयारीला लागावं असं म्हणतानाच भाजपशी युती हाच पर्याय असल्याचं म्हटले आहे. मराठा मार्ग या मासिकाच्या सप्टेंबरच्या अंकात ही भुमिका मांडण्यात आली आहे. त्यामुळे सत्तेसाठी ब्रिगेड आपला पारंपरिक विरोध गुंडाळून ठेवत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

भांडारकर संस्थेवर हल्ला करणारी, दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्याला विरोध करणारी आणि राष्ट्रवादीच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या ब्रिगेडच्या भुमिकेत सत्तेसाठी इतका बदल कसा काय होतो आहे अशी चर्चा कार्यकर्त्यांमधे रंगली आहे. दरम्यान हा ब्रिगेड मध्ये फूट पडल्यानंतर आणि फाटाफूट झाल्यानंतर राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठा हा बदल आहे का असाही सवाल विचारला जातो आहे. खेडेकरांची ही भुमिका त्यांचे सहकारी मान्य करणार का ते पहावं लागेल.

या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, MSS व RSS यांची तत्वे पुर्णपणे परस्परविरोधी आहेत, वैचारिक लढा चालूच राहील. परंतु राजकारणात अंतिम यश मिळणे हेच एकमेव तत्व. राजकारणात तडजोडीला कोणीच जवळचा किंवा परका नसतो. ‘जो जिता वही सिकंदर’ राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी जी किल्ली उपयोगी पडेल तीच वापरली पाहिजे. ‘संभाजी ब्रिगेड’ राजकारणात यशस्वी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी राजकीयदृष्ट्या यशस्वी व्हावे हेच खेडेकर साहेबांना यांच्या लेखातून सांगायचं आहे.

शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘राजकारण’ ज्यांना समजले… त्यांना पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांचे ‘सत्ताकारणातील राजकारण’ समजणार आहे. सर्वांनी आपले उपद्रव्यमूल्य जागृत ठेवले पाहिजे. संभाजी ब्रिगेड’ची विचारधारा सर्वोच्च आहे. रस्त्यावरचे कार्यकर्ते म्हणून किती दिवस असेच रस्त्यावरच खपणार…! असं शिंदे यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या