‘कबीर कला मंचाचा कार्यक्रम वस्तीत घेतला नसता तर एवढं झालं नसतं’

पुणे : पुण्यातून नऊ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला तरूण छत्तीसगढमधील माओवादी संघटनेचा कमांडर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. छत्तीसगढ पोलिसांनी माओवाद्यांची एक यादी तयार केली आहे. त्यामध्ये पुण्याच्या हा तरुण रांजनांदगाव या ठिकाणच्या तांडा एरिया कमिटीचा तो डेप्युटी कमांडर असल्याचे म्हटले आहे.

छत्तीसगड पोलिसांनी माओवाद्यांची एक यादी तयार केली आहे. या यादीत संतोष वसंत शेलार या पुण्यातील तरुणाचेही नाव आहे. संतोषला विश्वा या नावाने ओळखले जाते. भवानी पेठ परिसरातील कासेवाडी येथे राहात होता. जवळपास नऊ वर्षांपूर्वीच तो घरातून बेपत्ता झाला होता.

“कबीर कला मंचाचा कार्यक्रम वस्तीत घेतला नसता तर एवढं झालं नसतं. त्यानं कुठंबी असंल तिथनं घरी यावं. ना चिठ्ठी ना फोन.. आम्ही वाट बघतुया. एवढा निरोप संतोषला द्या,’ अशी आर्त विनवणी संतोषची आई सुशीला शेलार यांनी केली आहे. कबीर कला मंचाने माथी भडकावल्याने तो घर सोडून गेला, असा आरोप शेलार कुटुंबाने केला.

दिव्य मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत संतोषचा थोरला भाऊ संदीप शेलार म्हणाला, “संतोष नववीत असताना आमच्या झोपडपट्टीत कबीर कला मंचाचा कार्यक्रम झाला. माझा धाकटा भाऊ त्यांच्यात सामील झाला. संतोष त्याच्या पथनाट्यात नव्हता, तरी शेजारी राहणाऱ्या रूपालीच्या संपर्कात होता अन् एके दिवशी बेपत्ता झाला. त्याला दहा वर्षे उलटून गेली. सचिन माळी व कबीर कला मंचाचे लोक टीव्हीवर मुलाखती देतात. पण संतोषबाबत हात वर करतात. ते असेच जामिनावर मोकाट राहिले तर आणखी तरुण गोळा करून पाठवतील. आम्ही तक्रार देण्यासाठी पुढं आलो. अनेकांची मुलं गायब आहेत.”

पुण्यात कबीर कला मंचचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून संतोष काम करत असल्याची धक्कादायक माहितीही पुढे आली आहे. संतोषसोबत पुण्याच्या ताडीवाला रोड झोपडपट्टी येथील प्रशांत कांबळे हाही बेपत्ता झाला असून त्यानेही माओवादी चळवळीत सहभाग घेतल्याची शंका व्यक्त केली जात आहे.