‘संजयकाका पाटील एक लाख मतांच्या फरकाने निवडून येतील’

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सांगली लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले. निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघातून १२ उमेदवार नशीब अजमावत असून, त्यात भाजपचे संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील, वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यासह विविध पक्षांचे उमेदवार, तसेच अपक्ष रिंगणात आहेत.

दरम्यान, अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत बाजी भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील हेच मारतील असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. सांगली लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना रासपचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी महायुतीचा विजय होईल असा दावा केला. ते म्हणाले, सांगली लोकसभा निवडणुकीत मी रासप चा प्रवक्ता म्हणून अनेक छोट्या मोठ्या सभा घेतल्या आहेत, जत आणि आटपाडी ग्रामीण भागात पडळकर आणि पलूस कडेगाव सांगली परीसरात विशाल पाटील थोड्या फार प्रमाणात चालतील हा अपवाद वगळता सांगली लोकसभा मतदार संघात संजय काका पाटील सर्वत्र चालले आहेत, भाजप तर्फे पूर्णत्वास आलेल्या पाण्याच्या योजना, रस्ते विकास, महानगरपालिका क्षेत्रातील कार्य, आणि जिल्ह्यातील संपर्क पाहता संजय काका पाटील एक लाख मतांच्या फरकाने निवडून येतील असं म्हटलं आहे.

दरम्यान, २३ मे रोजी मिरजेतील शासकीय गोदामात मतमोजणी होणार असून, त्यामध्ये निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार, कोण बाजी मारणार आणि राजकीय समीकरणांवर त्याचा काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://www.youtube.com/watch?v=ZDYSgivQ3pU