अनावश्यक अस्मितांच्या नावाने सामाजिक दहशतवाद पसरवला जातोय : संजय सोनवणी

 टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता रितेश देशमुख याने रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीत बसून फोटो काढला आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून शेयर केल्यानंतर अवघ्या काही तासातच रितेश देशमुखच्या फोटोवर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया यायला सुरवात झाली. त्यानंतर रितेश देशमुखने सोशल मिडियाच्या माध्यमातून माफी मागितली. रितेश देशमुखच्या समर्थनार्थ आज पुण्यात ज्येष्ठ विचारवंत संजय सोनवणी यांनी पत्रकार परिषद घेऊन टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला. पुतळे, प्रतिमा आणि मुर्तींच्या गारुडात अडकवून सामाजिक तेढ माजवण्याचा प्रयत्न करणे हे गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य असल्याचं सोनवणी यांनी म्हटलं आहे.

महापुरुष अथवा अनावश्यक अस्मितांच्या नावाने उथळ भावनांवर स्वार होत कसलीही शहानिशा न करता अथवा सद्विवेकबुद्धी न वापरता भावना दुखावल्याचा आधार घेत सामाजिक तणाव वाढवण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढले आहेत.रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीत बसून फोटो काढून घेणाऱ्या रितेश देशमुखांवर अशाच उथळ लोकांनी भावना दुखावल्याचा आरोप करत टीकेची झोड उठवली.रितेश देशमुख आणि त्यांचे मित्र मेघडंबरीत शिवरायांच्या पायाशी बसले. त्यात त्यांचा कसलाही अनुचित हेतू दिसत नसताना  त्याचेच भांडवल करत शिवरायांचा अपमान  अशी वावडी उठवली गेली.यानंतर रितेशने आपला माफीनामा ट्वीटर वर पोस्ट केला.

या सगळ्या प्रकारानंतर रितेश देशमुखच्या समर्थनार्थ आज पुण्यात ज्येष्ठ विचारवंत संजय सोनवणी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. महापुरुषांचे दैवतीकरण करणे आणि त्यांचा वापर करुन आपले हेतू साध्य करुन घेणे हा समाजकंटकांचा धंदाच बनला आहे. सर्व महापुरुषांनी महाराष्ट्राच्या विचार आणि संस्कृतीवैभवात भरच घातली आहे. सहज भावनेने केलेल्या कृत्यांतुनही त्यांचा अवमान झाला असे मानणे अंधश्रद्धेचे आणि समाजाच्या सद्विवेकबुद्धीवर पडदा पडल्याचे लक्षण आहे. पुतळे, प्रतिमा आणि मुर्तींच्या गारुडात अडकवून सामाजिक तेढ माजवण्याचा प्रयत्न करणे हे गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य आहे. आम्ही या सर्व प्रकारांचा निषेध करतो असे ज्येष्ठ विचारवंत संजय सोनवणी म्हणाले.पत्रकार परिषदेत बोलताना संजय सोनवणी म्हणाले, सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि त्यामुळे घडणारे गुन्हे या सगळ्यावर आळा घालण्यास सायबर विभाग सपशेल अपयशी ठरला असल्याचा देखील आरोप त्यांनी केला.

रितेश देशमुखांवर अशाच उथळ लोकांनी भावना दुखावल्याचा आरोप करत टीकेची झोड उठवली.धमक्या दिल्या गेल्या, शिवीगाळ केली गेली, अगदी गुन्हा दाखल करेपर्यंत प्रकरण गेले. सर्वच महापुरुषांचे दैवतीकरण करत समाजात फुट पाडू पाहणाऱ्या या प्रवृत्ती भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर केलेल्या हल्ल्यापासून उफाळून आलेल्या दिसतात. यातून सामाजिक सौहार्दाला नख लावले जात आहे. या घटनांमुळे महाराष्ट्रातील वैचारिक असणारा तरुण मात्र अस्वस्थ झाला आहे. आम्ही अशा सर्व प्रकारच्या सामाजिक दहशतवादाचा तीव्र निषेध करतो असे तुषार दामगुडे म्हणाले.

त्यापुर्वी नाटककार राम गणेश गडकरींच्या पुतळ्याची तोडफोड करुन त्याची विटंबना केली गेली. त्यासाठी कारण दिले गेले ते १९२० सालच्या त्यांच्या एका अपुर्ण नाटकातील तथाकथित अवमानास्पद मजकुराचे. तर याआधीही महाराष्ट्रात वेळोवेळी महापुरूषांच्या पुतळ्यांच्या विटंबनेमुळे दंगली उसळल्या आहेत. कोठे ना कोठे या कथित अवमानाच्या घटना होत असतात कारण त्या केल्याने हा उथळ समाज कशी हिंसक प्रतिक्रिया देईल हे या उपद्रवींना चांगलेच माहित असते. त्यांचा हेतू साध्य करायला लोकच मदत करतात आणि हे कुठेतरी थांबायला हवे असे ब्लॉगर अक्षय बिक्कड म्हणाले.

अभिनेता रितेश देशमुखच्या पोस्टवर खासदार संभाजी राजे यांनीही प्रतिक्रिया दिली. चौथऱ्यावर बसून महाराजांच्या मूर्तीकडे पाठ करून फोटोसेशन करणं खरोखरच निंदनीय आहे. अशी प्रतिक्रिया खासदार संभाजी राजे यांनी दिली. तसेच आज होणाऱ्या रायगडावर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत खास नियमावली तयार करण्यात येणार असून, त्यातील नियम सर्वाना बंधनकारक असतील, असंही नमूद केल आहे.

आज झालेल्या या पत्रकार परिषदेत यावेळी प्रविण काळे, शशिमोहनसिंग गहेरवार, संकेत देशपांडे उपस्थित होते.