fbpx

संजय शिंदेंच्या निकटवर्तीयाला खंडणी प्रकरणात अटक, माढ्यात उलटसुलट चर्चांना उधाण

पुणे: माढा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार संजय शिंदे यांनी मतदारसंघात प्रचाराचा धडका लावला आहे, मात्र दुसरीकडे त्यांचे निकटवर्तीय राम जगदाळे यांना खंडणी प्रकणात अटक करण्यात आली आहे. जगदाळे यांच्या अटकेने माढ्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांनी देखील शिंदे आणि जगदाळे यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील लढाई राष्ट्रवादी आणि भाजपने प्रतिष्ठेची बनवली आहे, त्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर जोरदार निशाणा साधत आहेत. यामध्ये आता संजय शिंदे यांनी मागील काही दिवसांपासून माळशिरस विधानसभेसाठी ‘प्रमोट’ केलेले जगदाळे यांना गंभीर गुन्ह्यात अटक झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

संजय शिंदे आणि राम जगदाळे कनेक्शन

राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे आणि राम जगदाळे यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध असल्याचं नाव न लिहिण्याच्या अटीवर निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले आहे. शिंदे हे पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांची बडदास्त राखण्याची जबाबदारी जगदाळे यांच्याकडेच असे, संजय शिंदेच्या राष्ट्रवादी प्रवेशावेळी जगदाळे हे देखील बारामतीमध्ये उपस्थित होते. राम जगदाळे हे पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर खुनासह अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत

का झाली राम जगदाळेला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठी चित्रपट रोल नंबर १८ मधील नायक सुभाष यादव यांच्या तक्रारीवरून राम जगदाळे यांच्यासह दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल विष्णू टेकाळे (रा. स्वारगेट पोलीस लाईन), अभिनेत्री रोहिणी मच्छिंद्र माने (रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) व सारा श्रावण उर्फ सारा गणेश सोनवणे (रा. मुंबई सध्या दुबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुभाष यादव आणि रोहिणी माने यांनी रोल नंबर १८ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. रोहिणी यांच्याकडून तेव्हापासून लग्न करण्यासाठी यादव यांच्याकडे तगादा लावला होता, मात्र यादव यांनी नकार दिल्याने माने यांनी वानवडी पोलीस ठाण्यात यादव यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

हे प्रकरण मिटवण्यासाठी राम जगदाळे यांनी सुभाष यादव यांना आपल्या कार्यालयात बोलवून घेत जबरदस्तीने रोहिणी मानेचे पाय धरून माफी मागण्यास सांगितले तसेच सर्व गोष्टींचे चित्रीकरण करून १५ लाख रुपयांची मागणी केली. ठरल्याप्रमाणे पोलीस निरीक्षक टेकाळे यांनी १ लाख रुपये स्वीकारले. मात्र तरीही उरलेली रक्कम न दिल्याने राम जगदाळे, अमोल टेकाळे व रोहिणी माने यांनी संगनमत करून सारा सोनवणेचे मार्फत पाय धरून माफी मागतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली होती. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.