संजय शिंदेंचा पराभव बबनदादांसाठी धोक्याची घंटा

babanraw shinde

टीम महाराष्ट्र देशा-  संजय शिंदे यांचे बंधू आ.बबनराव शिंदे हे विधानसभेत माढ्याचे नेतृत्व गेली अनेक वर्षे करीत आहेत. शिंदे घराण्याचा आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनलेल्या माढा विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीत नगण्य लीड मिळाल्याने संजय शिंदे यांना पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. विरोधकांची एकी व सुप्त मोदीलाट यामुळेच राष्ट्रवादीचे मताधिक्य मर्यादित राहिले असे चित्र आहे.

लोकसभेसाठी माढा विधानसभा मतदारसंघात दोन लाख पंचवीस हजार मतदारांनी मतदान केले होते. यापैकी राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे यांना १ लाख ५ हजार मते, तर भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना ९८ हजार ५०० इतकी मते मिळाली. वंचित आघाडीचे अ‍ॅड. विजयकुमार मोरे यांना ९ हजार पाचशे इतकी मते मिळाली. या विधानसभा मतदारसंघातून संजयमामा शिंदे यांना केवळ साडेसहा हजार मतांचीच आघाडी मिळू शकली. ते मताधिक्य शिंदेंना अपेक्षेपेक्षा खूपच कमी राहिले. म्हणूनच त्यांना मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले.

या विधानसभा मतदारसंघात माळशिरस तालुक्यातील १४ गावांचा समावेश आहे. यामध्ये महाळुंग व बोरगाव गटाचा समावेश आहे. या १४ गावात मोहिते-पाटलांचे वर्चस्व असल्याने येथे एकतर्फी मतदान झाले. येथून नाईक-निंबाळकर यांना सुमारे २२ हजार मते मिळाली तर संजयमामा शिंदे यांना केवळ ५ हजार मतांवर समाधान मानावे लागले. निंबाळकर यांना महाळुंग व बोरगाव गटातील १४ गावांतून १७ हजारांची लीड मिळाली. यामुळे माढा तालुक्यातील ७८ गावांतून शिंदे यांना मिळालेली सतरा हजारांची लीड न्यूट्रल झाली.

माढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील ४२ गावांचा समावेश आहे. या ४२ गावांमधील करकंब येथे घासून मतदान झाले तर भोसे गावातून शिंदे यांना सुमारे २३०० एवढे मताधिक्य मिळाले. पंढरपूर तालुक्यातील ४२ गावांमधून मिळालेली सुमारे ६ हजारांची लीड हीच माढा विधानसभा मतदारसंघातील शिंदे यांचे मताधिक्य राहिले.राष्ट्रवादीचे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये असलेले पदाधिकारी हे स्वतःच्या जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती मतदारसंघात निर्णायक मताधिक्य देऊ शकले नाहीत. या निकालामुळे राष्ट्रवादी बॅकफूटवर गेली आहे.