fbpx

जिल्हा परिषदेत सत्ता आमचीच, संजयमामा शिंदेंनी दंड थोपटले

sanjay mama shinde

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीत झालेल्या उलथापालथीमुळे सोलापूर जिह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे, मोहिते पाटलांचा भाजप तर संजयमामा शिंदेंच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशाने राजकीय गणित बदलले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मीच विजयी होणार असून, जिल्हा परिषदेत देखील आपलीच सत्ता राहणार असल्याचं संजय शिंदे यांनी म्हंटले आहे. शिंदे यांनी आजवर भाजपशी घरोबाकरत जि प अध्यक्षपद आपल्याकडे राखले होते.

सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात संजय शिंदे यांनी समविचारी नेत्यांची मोट बांधत जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली होती, मात्र लोकसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. शिंदे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ सोडल्याने दुखावले गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा पराभव करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत.

कधीकाळी शिंदेंच्या समविचारी गटातील असणारे माजी आ राजेंद राऊत, आ प्रशांत परिचारक, शहाजीबापू पाटील, आ जयकुमार गोरे यांनी शिंदेंना धोबीपछाड देण्यासाठी काम केले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत संजय शिंदे विजयी झाल्यास त्यांना जि पचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे, अशावेळी मोहिते पाटील समर्थक सदस्य आणि पक्षातील सदस्यांच्या जोरावर सत्ता स्थापनेचे प्रयत्न भाजपने चालवले आहेत. मात्र दुसरीकडे संजय शिंदे यांनी देखील दंड थोपटत झेडपी आमचीच अशी घोषणा दिली आहे. तसेच जिल्ह्यातील समविचारी नेते आपल्या सोबतच असल्याचा दावा केला आहे.