संजय राऊतांचा रोखठोक, म्हणाले गांधीजींच्या वावरण्यानेच देश थोडा जिवंत आहे

sanjay raut mahamtma gandhi

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार संजय राऊत म्हणाले गांधीजींच्या वावरण्यानेच देश थोडा जिवंत आहे. संजय राऊत यांचे मागील काही दिवसात बॉलीवूड अभिनेत्री कंगणा रनौत सोबत चांगलाच वाद चालू होता. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार संजय राऊत व बॉलीवूड अभिनेत्री कंगना हिच्या सोबतचा वाद चांगलाच रंगला होता.

सामना अग्रलेख :-

2 ऑक्टोबर हा गांधीजींचा जन्मदिवस. गांधीजी साबरमती सोडून महाराष्ट्रात आले. वर्ध्यातील सेवाग्रामला 12 वर्षे राहिले. सेवाग्राम हे त्या काळात देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे शक्तिस्थळ होते. खरा ‘भारत’ आजही तेथेच आहे. गांधीजी तेथे जिवंत आहेत. 30 जानेवारी 1948ला गांधीजींची हत्या झाली नसती तर ते परत सेवाग्रामला येणार होते. तसे त्यांनी ठरवलेच होते.

गांधीजी आणि महाराष्ट्राचा संबंध जिव्हाळ्याचा होता. गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीस सर्व प्रकारची रसद पुरविण्याचे काम महाराष्ट्राने केले. वर्ध्याचा सेवाग्राम आश्रम हा त्याच कार्याचा महत्त्वाचा टप्पा होता. 1942 साली काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक वर्ध्यात झाली. त्यात ‘भारत छोडो’ आंदोलनाचे रणशिंग फुंकले. ‘भारत छोडो’ आंदोलनाचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे योगदान आहे. गांधीजी त्यांच्या आंदोलनाच्या जागृतीसाठी सतत खेडय़ात गेले.

मग ते वर्धा असेल नाहीतर चंपारण्य. ते प्रवास करीत राहिले. गांधीजी हिंदुस्थानात आले 1915 साली. त्यावेळी राजकीय चळवळीत ‘पुनश्च हरि ॐ’ म्हणून नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न लोकमान्य टिळकांनी सुरू केला होता. त्याआधीच्या सात-आठ वर्षांत हिंदुस्थानातील सारा जीवनप्रवाहच जणू स्थगित झाल्यासारखा, थंडावल्यासारखा झाला होता. टिळकांचा प्रभाव जनमानसावर होताच, पण गांधीजींनी नंतर टिळकांची जागा घेतली. टिळक त्यांचे सर्व राजकारण पुण्यातूनच करीत. गांधींजींनी देशभर भ्रमण केले. 1931 साली गांधीजी गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला गेले होते.

पत्रकारांच्या एका परिषदेत स्वतंत्र हिंदुस्थानात कशा प्रकारची राजव्यवस्था व घटना आपल्याला अभिप्रेत आहे, असा एक प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता महात्मा गांधींनी त्याला उत्तर दिले व आपल्या मनातील भावी हिंदुस्थानबाबतच्या आकांक्षा आणि कल्पना स्पष्ट केल्या. त्यावेळी ते म्हणाले होते, ”हिंदुस्थानला सर्व प्रकारच्या गुलामीतून आणि दैन्यावस्थेतून मुक्त करणारे आणि आवश्यकता पडल्यास पाप करण्याचेही अधिकार मिळवून देणारे संविधान निर्माण होईल असा मी आटोकाट प्रयत्न करीन. अत्यंत दरिद्री माणसालाही ‘हा माझा देश आहे आणि त्याचे भवितव्य ठरविण्यात माझ्या शब्दालाही किंमत आहे.’ असे वाटू शकेल अशा हिंदुस्थानची मला रचना करावयाची आहे,” असे गांधीजी म्हणाले. त्याच राष्ट्राच्या स्थापनेचा संकल्प घेऊन महात्मा गांधी सेवाग्राम येथे 1936 साली पोहोचले.

वर्ध्यात आले

गांधीजी 1934 साली वर्धा जिल्ह्यातील मगनवाडी येथे आले. त्यानंतर 1936 साली ते तेथून सेवाग्रामला गेले. हे मूळ गाव ‘सेगाव’ वर्ध्यापासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. 300 एकर जमिनीवर सेवाग्राम आहे. ‘बापू कुटी’ नावाने तो ओळखला जातो. गांधीजी वर्ध्यात आले तो एक रोचक इतिहास आहे. 6 एप्रिल 1930 ला गुजरातच्या दांडी समुद्रकिनाऱयावर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करून कायदेभंग केला. गांधीजींना अटक करून कोणताही खटला न चालवता पुण्याच्या येरवडा तुरुंगात टाकले गेले. 1933 साली त्यांची सुटका झाली. त्यानंतर गांधीजींनी देशव्यापी हरिजन यात्रा सुरू केली. गुजरातमधून निघताना त्यांनी एक निश्चय केला होता, आता स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय पुन्हा साबरमती आश्रमात येणार नाही. त्यामुळे पुढील कार्यासाठी त्यांना साबरमती जाता येणे शक्य नव्हते. मध्य हिंदुस्थानातील एका गावात स्वातंत्र्य चळवळीचे एक मुख्यालय बनविण्याचे त्यांनी नक्की केले. 1934 साली जमनालाल बजाज व अन्य साथीदारांनी गांधीजींना वर्ध्यात येण्याचा आग्रह केला. गांधीजी प्रथम मगनवाडीत व मग सेगावला पोहोचले. गांधीजी सेवाग्रामला येताच गावकरी जमले.

तेथे त्यांनी छोटेसे भाषण करून सेवाग्रामला येण्याचे प्रयोजन स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या एका दूर खेडय़ात जेथे फक्त चारही बाजूंनी जंगल आहे त्या जंगलात गांधीजींचे 12 वर्षे वास्तव्य होते. याच गावाने हिंदुस्थानात स्वातंत्र्य व क्रांतीचे बीज रोवले. गाव कसे होते? संपूर्ण जंगल. ना पोस्ट ऑफिस, ना दळणवळणाचे साधन. सेवाग्रामकडे येण्यासाठी एक पायवाट आणि बैलगाडीचा रस्ता होता. जागोजागी साप आणि विंचू निघत. गांधीजींसाठी सेवाग्रामात एक कुटी निर्माण करण्यात आली. या कुटीकरिता पाचशे रुपयांपेक्षा जास्त खर्च करू नका ही गांधीजींची अट होती. या कुटीला ‘आदिनिवास’ असे नाव दिले. या कुटीत स्वतः महात्मा गांधीजी, कस्तुरबा गांधी, सरहद्द गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राहायचे. पुढे याच कुटीतून गांधीजी बापू कुटीत राहायला गेले. कारण या कुटीत गर्दी वाढू लागल्याने कस्तुरबांची कुचंबणा होऊ लागली.

पत्रव्यवहाराचा घोळ

सेवाग्रामचे मूळ नाव सेगाव होते, पण गोंधळ असा व्हायचा की, नागपूर भुसावळ रेल्वे मार्गावर शेगाव नावाचे रेल्वे स्टेशन असलेले गाव होते. ते तीर्थस्थळही होते. त्यामुळे गांधीजींची पत्रं ‘चुकीच्या’ पत्त्यावर जाऊ लागली. वर्ध्याच्या सेगावचे ‘डाक’ भुसावळच्या शेगावला जाई. त्यामुळे हा गोंधळ टाळण्यासाठी गांधींच्या सल्ल्याने सेगावचे सेवाग्राम केले. सेवाग्रामला गांधीजी 12 वर्षे राहिले. या काळात स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रबिंदू सेवाग्राम हेच राहिले. याच आश्रमातून गांधीजींनी ‘आत्मनिर्भर’ ही संकल्पना मांडली. गांधीजी येथे आले तेव्हा विजेचे कनेक्शनही नव्हते. जेव्हा गांधीजी प्रथम या जागेवर पोहोचले तेव्हा त्यांनी आपल्या मित्रास पत्र लिहिले, ‘मी एका अशा गावात वास्तव्यास आलो आहे जेथे डाकघर नाही. आरोग्यविषयक सुविधा नाहीत.

खाण्यापिण्याच्या चांगल्या वस्तू मिळतील असे दुकान नाही. पावसाळय़ात तर फक्त चिखलच चिखल.’ पण येथे आल्याचा गांधीजींना आनंद होता. ते अशा एका स्थानी पोहोचले होते जेथे सत्ता, वैभव, श्रीमंती यांची सावलीही नव्हती. याच जागेवरून त्यांना स्वतंत्र हिंदुस्थानसाठी संघटन बांधायचे होते. वरिष्ठ काँग्रेस नेते येथे येत. त्यांना येथे खऱया ग्रामीण हिंदुस्थानचे दर्शन होत असे. गांधीजींना तेच अभिप्रेत असे. रस्ते म्हणजे चिखलाचे खड्डे होते. रेल्वे स्टेशनवरून जाण्या-येण्यासाठी एका जुन्या फोर्ड गाडीची व्यवस्था होती. पण या फोर्ड गाडीला बैलांना ओढून न्यावे लागत असे. हा आपला खरा हिंदुस्थान आहे. या हिंदुस्थानला जागे करायला हवे, असे गांधीजी सांगत. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विचार त्यामुळे सेवाग्रामातच निर्माण झाला.

संयम आणि शांतता

सेवाग्राम आश्रमात जाण्याचा योग मला अनेकदा आला. शांतता, संयम यांची अनुभूती या वास्तूत येते. गांधीजींचे व्यक्तिमत्त्व आजही जिवंत आहे असा भास होतो. एका मंदिरात प्रवेश केल्याचा आनंद लाभतो. जमनालाल बजाज यांच्या सहकार्याने हे सर्व उभे राहिले. जमनालालजींची गांधीजींवर अपार श्रद्धा होती. जमनालाल बजाज यांची कुटी याच ठिकाणी आहे. आश्रमाच्या मधोमध प्रार्थनास्थळ आहे. मोठे भोजनस्थान आणि रसोईघर आहे. गोशाळा आहे. एक अद्भुत असे आदर्श ‘गाव’ येथे वसले आहे. बापू कुटीचा महिमा मोठा आहे. या कुटीत त्यांच्या सहकारी राजकुमारी अमृत कौर, प्यारेलाल असे निकटवर्तीय राहात. या कुटीत आजही बापूंचे सामान तसेच ठेवले आहे. गीता, बायबल, कुराण, गादी, त्यांची काठी तशीच ठेवली आहे. याच कुटीतील एका जागेत राजकुमारी अमृत कौर या झोपत असत. ही जागा त्यावेळी सिमेंटने सारवली होती. कारण राजकुमारी अमृत कौरना मातीची ऍलर्जी होती. याच कुटीत बापूंचा टाइपरायटर आणि साप पकडण्याचे पिंजरे ठेवले आहेत. बापू कुटीत राहात असतानाच गांधीजींना अचानक दम्याचा त्रास सुरू झाला तेव्हा डॉक्टरांनी त्यांना थोडय़ा उंच जागी झोपण्याचा सल्ला दिला. जमनालाल बजाज यांची कुटी सगळय़ात शेवटी व उंचावर होती. गांधीजींनी तेथेच आपला मुक्काम हलवला. देशाच्या विभाजनाचा भडका उडाला. बंगालमध्ये नौखालीत जातीय दंग्याचा वणवा पेटला. गांधीजी अखेरच्या काळात याच कुटीतून बंगालसाठी रवाना झाले. पुन्हा ते परतलेच नाहीत. त्यांना पुन्हा यायचे होते, ते जमले नाही. 30 जानेवारी 1948 ला दिल्लीत त्यांची हत्या झाली नसती तर ते वर्ध्याला येण्याच्या तयारीत होते. त्यांचे रेल्वे तिकिटाचे बुकिंगसुद्धा झाले होते.

गुजरातमधून महाराष्ट्रात आलेल्या गांधीजींचे जीवन अत्यंत साधे होते. गांधीजींचे जीवनदर्शन ज्यांना समजून घ्यायचे आहे त्यांनी सेवाग्राम आश्रमात एकदा जरूर जायला हवे. आजही तेथे चरखा चालवला जातो. परंपरा, संस्कार, संस्कृतीचे पालन तेथे हेते. सेवाग्राममध्ये राहात असतानाच गांधीजींनी एकदा सांगितले होते, ‘माझे जीवन हाच माझा संदेश आहे.’ सेवाग्राममध्येच राहताना (1937) गांधीजी म्हणाले होते, ”विश्वास ठेवा, मला जसे राहण्याची इच्छा होती त्याच पद्धतीने मी आज राहत आहे. ही माझ्या जीवनाची संध्याकाळ आहे. सेवाग्रामच्या जीवनाचा, येथील वातावरणाचा प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे.” सेवाग्राममध्ये एक वही ठेवली होती. त्यात गांधीजी आश्रमवासीयांना काही सूचना करीत. वहीच्या पहिल्याच पानावर लिहिलेले असे, ‘सेगाव संपर्कासाठी!’ त्यात गांधीजींच्या सूचना कशा असत ते पहा –

थुंकी हा मळ आहे. घाण आहे. ज्या जागी आपण थुंकता किंवा हात धुता तेथे भांडी साफ करू नयेत. (6-8-1936)
मिठाचा जास्त वापर करू नका. पाणी वाया घालवू नका. सगळय़ांनी आश्रमातील प्रत्येक गोष्ट ही आपली आणि गरीबांची आहे हे समजून वापरावी.
सेवाग्राममधले गांधी जीवन हे असे होते. अल्बर्ट आइनस्टाईन एकदा गांधींविषयी म्हणाले होते, ‘गांधीजी हे आमच्या काळातील एकमेव सच्चे महापुरुष असल्याचे मी मानतो. येणाऱया पिढीस विश्वास ठेवणे कठीण जाईल की, हाडा-मांसाचीच बनलेली गांधीजींसारखी व्यक्ती खरोखरच या धरतीवर कधीकाळी वावरत होती.”

ते खरेच आहे.

गांधीजी आजही सेवाग्राममध्ये वावरत आहेत. त्यांच्या वावरण्याने देश थोडा जिवंत आहे!

महत्वाच्या बातम्या :-