‘मोदी-ठाकरे एकत्र आल्यावर चर्चा तर होणारच !’; संजय राऊतांची प्रतिक्रिया

sanjay raut

मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अशोक चव्हाण, अजित पवार यांनी महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भाष्य केलं. तर, ठाकरे व मोदी यांची वैयक्तिक वेगळी भेट झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पत्रकार परिषदेमध्ये खुद्द उद्धव ठाकरेंनी या भेटीची कबुली दिली आहे.

‘आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींची वैयक्तिकरित्या ३० मिनिटे भेट घेतली. सत्तेत एकत्र नाहीत याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही. या भेटीत वावगं काहीच नाही. मी काही नवाझ शरीफ यांच्या भेटीसाठी गेलो नव्हतो,’ असा टोला लगावतानाच आजची भेट ही अधिकृत असल्याची देखील त्यांनी आवर्जून नोंदवलं. दरम्यान, या ३० मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं याबाबत त्यांनी खुलासा केला नसून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून नरेंद्र मोदी यांची ठाकरे घराण्याशी असलेली मैत्री ही वेळोवेळी देशाने पाहिली आहे. या भेटीमुळे आता दोन भाऊ एकत्र येऊन पुन्हा युती होणार का ? याबाबत अनेक तर्क वितर्क केले जात आहेत.

यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य करताना भाजप नेत्यांना टोला लगावलाय. ‘अशावेळी चर्चा तर होणारच! मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या विषयांबाबत पंतप्रधान मोदींचा दृष्टीकोन सकारात्मक असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यांना या भेटीचे राजकीय संदर्भ काढायचे असतील त्यांनी काढावेत,’ असं म्हणतानाच सरकार कोसळण्याच्या भाकितांवरून देखील राऊतांनी भाजप नेत्यांना कानपिचक्या काढल्या आहेत. ‘भाजप नेत्यांचे अंदाज नेहमीच चुकत आले आहेत. आताही ते चुकतील,’ असं संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या