बिग ब्रेंकिंग : कॉंग्रेस नेत्यांबरोबर संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा : सत्ता स्थापनेसाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीत तिढा वाढल्याने राज्यात कोणाचे सरकार येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र आता कॉंग्रेस नेते  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या भेटीला मुंबई येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत . तर शिवसेना नेते खा. संजय राऊत हे देखील शरद पवारांच्या भेटीला निवासस्थानी दाखल होणार आहेत.

राज्यात राजकीय अस्थिरता असताना शिवसेना आणि भाजपमधील सत्ता संघर्ष हा शिगेला पोहचला आहे. अशी सगळी विदारक राजकीय परिस्थिती असतानाचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील घरी राजकीय हालचालींना सुरवात झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटी नंतर कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत.अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात आदि नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

राज्यात सत्ता संघर्षाचे सत्र अद्याप सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यामांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आम्ही सत्ता स्थापनेच्या चर्चेसाठी प्रयत्न करत आहोत. मात्र शिवसेनेने चर्चा थांबवली आहे. तर अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेला कोणतही आश्वासन दिलं गेल नव्हत,असे फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तर अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाबाबत भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर चर्चा झाली होती, भाजप आता खोत बोलत आहे, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत.

दरम्यान या सर्व सत्ता संघर्षामध्ये राज्यात सत्ता कोणाची येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने भाजप व्यतिरिक्त सत्ते स्थापनेसाठी आम्हाला इतर पर्याय उपलब्ध आहेत, असा सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा पाठींबा घेऊन सत्ता स्थापन करणार का ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.