“मातोश्रीच्या नादाला लागाल तर गोवऱ्या स्मशानात…” ; राऊतांची राणा दाम्पत्याला धमकी

नागपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थाना समोर आज (२३ एप्रिल) हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा राणा दाम्पत्यानी दिला होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून याच्याच चर्चा अधिक रंगत होत्या. मात्र आज दुपारी पत्रकार परिषद घेत राणा दाम्पत्यानी आंदोलन थांबवण्याची घोषणा केली आहे. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी राणा दाम्पत्यानी आंदोलनातून पळ काढला, असा टोला लगावत इशारा दिला आहे.

“मोदींच्या दौऱ्याला गालबोट लागेल म्हणून माघार घेतल्याचा राणा दाम्पत्याचा दावा सपशेल खोटा आहे. हिंदुत्वाच्या नावाने भाजपच्या काही लोकांनी यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शिवसेनेवर हल्ला केला. काल आणि आज यांना मातोश्रीवर घुसून काही वेगळे कारस्थान करायचा यांचा डाव होता. हनुमान चालीसा वाचायची होती तर अनेक आध्यात्मिक जागा आहेत, त्यासाठी मातोश्री निवडणे आणि दंगल परिस्थिती निर्माण करणे, हे कुणाचे कारस्थान आहे? यांचा हिंदुत्वाशी संबंध काय आहे? श्री रामाचे नाव घेण्याला या बंटी आणि बबलीचा विरोध होता. अयोध्या आंदोलनाला यांचा विरोध होता आणि आज हे लोक हनुमान चालीसा अशी भाषा वापरून महाराष्ट्रापुढे आव्हान निर्माण करत आहेत. मात्र शिवसेनेचे हिंदुत्व घंटा धारी नसून गदा धारी आहे.”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

तसेच कृपा करून शिवसेनेच्या, मातोश्रीच्या वाट्याला जाऊ नका. मातोश्रीशी छेडछाड करू नका अन्यथा २० फुट खोल गाडले जाल. शिवसेनेच्या संयमाची परीक्षा पाहू नका. आम्हाला राष्ट्रपती राजवटीची धमकी देऊ नका. कायदा आणि घटना कुणाला शिकवायची असेल तर राज्याच्या राज्यपालांना शिकवा. मातोश्रीच्या रेकीपणाचा काल-आज प्रयत्न झाला. मात्र यापुढे जर कुणी मातोश्रीच्या नाडी लागलं तर त्यांनी आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून यावं. अशी धमकी संजय राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणा दाम्पत्यानी आंदोलन थांबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. “राज्यात पोलिसांना सामान्य जनतेला त्रास होऊ नये आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रस्तावित मुंबई दौरा रद्द होऊ नये यासाठी आम्ही आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे”, असे रवी राणा यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: