मुंबई: आज (२० जून) विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी रिंगणात एकूण ११ उमेदवार उतरले आहेत. त्यामुळे आजच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान मोदी संत तुकारामांच्या देहू गावी अवतरले व संतांची पगडी घालून म्हणाले, “भेदाभेदी नको”, पण भेदाभेदीचे टोक त्यांच्याच काळात गाठले आहे. मलिक-देशमुखांना मतदानाची परवानगी नाही, हे भेदाभेदीचेच राजकारण. पण त्याच वेळेला लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक या दोन आजारी आमदारांना अत्यंत नाजूक स्थितीत मतदानास उचलून आणले जाते. हे दोन्ही आमदार कर्करोगाशी झुंजत आहेत. व्हेंटिलेटरवर त्यांचा श्वास आहे असे म्हणतात, पण राजकीय स्वार्थ असला की, माणुसकी तुडवून त्यांना स्ट्रेचर व व्हीलचेअरवर मतांसाठी आणले जाते. विजयाची किंवा चमत्काराची इतकीच खात्री असताना हे अमानुष, अघोरी प्रयोग कशासाठी? पण राजकीय फायद्यासाठी भाजप कोणत्याही अमानुष थरापर्यंत घसरू शकतो. याचेच नाव चमत्कार! असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्या. दुसऱ्या पसंतीच्या मतांवर तिसरी जागा जिंकण्यात भाजपला यश आले. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतही चमत्कार होईल, असे विरोधी पक्षनेते श्री. फडणवीस व भाजपचे प्रांताध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे आहे. राज्यसभेची निवडणूक भाजपने सरळ मागनि किंवा नियमांचे पालन करून जिंकलेली नाही हे सगळेच जाणतात. अर्थात, सध्या राजकारणातील मैदानात सगळेच माफ आहे. विशेषतः कलियुगात जे मोदीयुग सुरू झाले, ते राजकारण नसून दुष्टकारण आहे. राज्यसभेची व विधान परिषदेची निवडणूक टाळता आली असती. विधान परिषदेची पाचवी जागा जिंकण्यासाठी भाजपला किमान 20 मतांची गरज आहे. तरीही “आम्हीच चमत्कार करणार” असा धोशा या मंडळींनी लावला आहे. हातात केंद्रीय सत्ता, तपास यंत्रणा, न्यायव्यवस्थेचे दोरखंड असल्यामुळे सर्व दाबदबाव वापरून जादा उमेदवार उभा करायचा व जिंकायचे असे खेळ सुरू आहेत. असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
आयपीएल सामन्यांत गुजरातचा संघ ज्या पद्धतीने जिंकवून आणला (असे भाजपचेच डॉ. सुब्रमण्यम स्वामी सांगतात) तसेच घपले करून भाजप या निवडणुका जिंकू पाहत आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मते ‘दिल्ली’तील यंत्रणांचा वापर करून बाद करण्याची कलाबाजी भाजपने दाखवून दिली आहेच, पण अनिल देशमुख, नवाब मलिक या विधानसभा सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळू नये यासाठीही पडद्यामागून करामती केल्याच, नवाब मलिक व देशमुखांना राज्यसभेत मतदानाचा हक्क न्यायालयाने नाकारला. आता विधान परिषद निवडणुकीतही या दोन विधानसभा सदस्यांना मतदानाचा हक्क नाकारला. हे संविधानाच्या कोणत्या कलमात बसते? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IND vs SA : भारताचं स्वप्न यावेळीही राहील अपूर्ण; निर्णायक सामना पावसामुळे रद्द
- IND vs SA : निर्णायक सामन्यात पावसाची पुन्हा एकदा एंट्री, खेळ थांबवला!
- अग्निपथ योजनेवर रवी किशन यांचे ट्विट व्हायरल, पाहा काय म्हणाले…
- शिवसेनेच्या बाण्यामुळे राणा पायाशी येतील – संजय राऊत
- आघाडीचे आमदार त्यांची नाराजी बुलेट आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून व्यक्त करतील – भागवत कराड
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<