संजय राऊतांची राज्यसभेत अनोखी मागणी, अंड आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा मिळावा

टीम महाराष्ट्र देशा : राज्यसभेत शिवसेना खा. संजय राऊत यांनी अनोखी मागणी केली आहे. अंड आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा द्यावा अशी मागणी राऊत यांनी आयुष मंत्रालयाला केली आहे. सोमवारी राऊत राज्यसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी नंदुरबार आणि हरियाणातल्या आदिवासी समाजाचे उदाहरण देत ही मागणी केली आहे.

राऊत म्हणाले की, मी एकदा महाराष्ट्रातल्या नंदुरबारमध्ये गेलो होतो. नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे, तिथल्या काही आदिवासी बांधवांनी मला जेवणाचं ताट आणून दिलं. मी त्याला विचारलं काय आहे जेवणात? तर तो म्हटला ही कोंबडी आहे. मी म्हटलं मला कोंबडी नको, तर तो म्हटला ही आयुर्वेदीक कोंबडी आहे जी तुम्ही खाल्लीत तर तुमच्या शरीरात जर काही आजार असतील तर ते बरे होऊ शकतात असा दावाही त्याने केला. आम्ही या कोंबडीचे पालनपोषणच अशा रितीने करतो की ती आयुर्वेदीक कोंबडी म्हणूनच वाढवली आहे. आयुष मंत्रालयाने याची दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी माझ्याकडे हरीयाणा येथून काही लोक आले त्यांनी आयुर्वेदीक अंडे हा शब्द प्रयोग केला. मी त्यांना विचारलं की अंडे आयुर्वेदीक कसे काय? तर त्यांनी सांगितले की आम्ही पोल्ट्रीतल्या कोंबड्यांना आयुर्वेदीक खाद्य देतो ज्यामध्ये लवंग, मुसली, तीळ अशा जिन्नसांचा समावेश आहे. हे खाणं खाल्ल्यानंतर कोंबड्या जी अंडी देतात ती शाकाहारी आणि आयुर्वेदीक असतात असाही दावा त्या शेतकऱ्यांनी केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. ज्यांना प्रोटीन्सची गरज आहे आणि मांसाहार ज्यांना करायचा नाही असेही लोक हे अंडे खाऊ शकतात असाही दावा त्यांनी केल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान भारतात शाकाहार आणि मांसाहार यामध्ये कमालीचे भेदभाव आहेत. त्यात अंड शाकाहारी आहे की मांसाहारी यावरून अनेकदा वाद विवाद होताना दिसतात. त्यामुळे आता संजय राऊत यांनी केलेल्या मागणीची आयुष मंत्रालय दखल घेणार का ? हे पाहणे औत्सुक्याच ठरणार आहे.