सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशाबाबत संजय राऊतांनी केला मोठा खुलासा

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष सचिन आहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबईतील अस्तित्व धोक्यात आले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेची ताकद अहिर यांच्या येण्याने वाढली आहे. यावरून शिवसेनचे खा. संजय राऊत यांनी अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत मोठा खुलासा केला आहे.

सचिन अहिर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले आहे.त्यांना आम्ही कोणतंही वचन दिलेलं नाही. कोणत्याही कमिटमेंटशिवाय ते शिवसेनेत आले आहेत. त्यांनी स्वतः हून शिवसेनेला आपलेसे केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्ष सोडावा, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला होता. ज्यांना आज या पक्षांतराची चिंता वाटते, त्यांनी आधी काय केलं, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकांना आता काही काळ शिल्लक राहिला आहे. मात्र त्या पूर्वीच काँग्रेस – राष्ट्रवादी पक्ष खिळखिळा झाला आहे. सत्ता असताना केलेले घोटाळे झाकण्यासाठी आणि आपल्यावर कोणत्याही चौकशीची टांगती तलवार असू नये, यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक नेते सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तसेच राष्ट्रवादीचे अनेक नेते काही दिवसातचं भाजपात प्रवेश करत आहेत.राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. तर शिवेंद्रसिंहराजे भोसले, गणेश नाईक, या धुरंधर नेत्यांची नाव देखील भाजप प्रवेशासाठी चर्चेत आहेत.