अहिल्यादेवी होळकरांची तुलना ममता बॅनर्जींशी करणाऱ्या संजय राऊतांनी जनतेची माफी मागावी! जय मल्हार सेनेची मागणी

औरंगाबाद : रयतेची आयुष्यभर सेवा करून जनतेचे कल्याण हीच भावना ठेवून आयुष्य पणाला लावणार्‍या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तुलना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी करून खा. संजय राऊत यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा, विचारांचा अपमान केला आहे. यामुळे त्यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी जय मल्हार सेनेने विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनामधील रोखठोक या स्तंभामधून भाजपच्या पश्चिम बंगालमधील पराभवावर भाष्य केलंय. यात संजय राऊतांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तुलना अहिल्याबाई होळकर यांच्याशी केलोली आहे.
ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला नाहीतर आभाळ कोसळेल, असे वातावरण देशात निर्माण केले गेले. पण शेवटी ममता बॅनर्जींकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. जे नव्हते तेच बाईंनी पणाला लावले. या लढ्याची तुलना अहिल्याबाई होळकरांच्या लढ्याशीच करावी लागेल, असे वक्तव्य राऊत यांनी केले होते.

त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत आपल्या निवेदनात जय मल्हार सेनेने म्हटले आहे की, कोणी राजकारणासाठी अहिल्यादेवी होळकर सारख्या राष्ट्रव्यापी व्यक्तिमत्वाची नावे वापरून त्यांची तुलना आजच्या एखाद्या नेतेमंडळींशी करत असेल तर राज्यातील अहिल्याप्रेमी नागरिक विशेषतः धनगर समाज हे कदापि खपवून घेणार नाही. यासाठी खा. संजय राऊत यांनी जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी जय मल्हार सेनेने विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या शिष्टमंडळात जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहू शेवाळे, तान्हाजी पांढरे, तुळशीदास खटके, श्रीहरी पाटील, प्रभाकर भुजबळ, ऋषिकेश कोरे आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या