मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. यानंतर हनुमान चालीसा या प्रकरणाने राज्यातील वातावरण चांगलेच तापले. या पार्श्वभूमीवरच काल (२९ एप्रिल) शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाबरी मस्जिद पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? असा सवाल केला. यावर उत्तर देत मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुख्यमंत्र्यांची मेमरी इरेज झाली आहे, अशी टीका केली. दरम्यान, संदीप देशपांडे यांच्या टीकेवर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘हिंदुत्ववादाचं कातडं आता ज्या लोकांनी पांघरलंय ते कातडं सुद्धा भाड्याचं आहे. १९९२ ची दंगल विसरले का? त्याच्यामध्ये शिवसैनिकांनी बलिदान दिल, अयोध्येच्या आंदोलनामध्ये शिवसैनिकांनी केलेला त्याग ते विसरले का? आम्हाला हिंदुत्व भाड्याने घ्यावं लागत नाही. ते आमच्या रक्तामध्ये आहे. आम्ही कोणाला वापरू देत नाही. ज्याक्षणी आम्हाला वाटलं की आमचा वापर होतोय त्या क्षणी आम्ही लाथ मारून बाहेर पडणारो स्वाभिमानी महाराष्ट्राची लोकं आहोत. छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे औरंगजेबाच्या दरबारातून स्वाभिमान म्हणून बाहेर पडले आहेत. त्याप्रमाणे शिवसेना हिंदुत्वाचा अपमान होतोय हे लक्षात आल्यावर युतीमधून बाहेर पडलेली आहे आणि स्वाभिमानानं आज उभी आहे. आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवू नये. तुम्ही अडचणीत याल’, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, ‘मुख्यमंत्र्यांची मेमरी इरेज झाली आहे. म्हणून मुख्यमंत्री असले प्रश्न विचारतात, जेव्हा उद्धव ठाकरे फोटोग्राफीमध्ये मशगुल होते तेव्हा राज साहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत राज्यभर दौरे करत होते. शिवसेना वाढवण्याचे काम करत होते. राज ठाकरे यांनी विनंती केल्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष केले हे उद्धव ठाकरे यांनी विसरू नये. हे नव पुरोगामी झाले असून, यांना राज ठाकरे यांच्या सभेनंतर आज आठवण होते की आपण हिंदू आहोत’, अशी टीका संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “शिवसेना समोरून वार करणारा पक्ष, पाठीमागचे वार…”, संजय राऊत यांचा विरोधकांना टोला
- “… तर त्या पाण्यामध्ये आम्हाला इतरांना बुडवावं लागेल”, संजय राऊत यांचा इशारा
- “कुणाचं हिंदुत्व बोगस आणि कुणाचं…”; नितिन सरदेसाई यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
- “आम्ही भाजपकडून शिकतो..”, रोहित पवारांची जाहीर कबुली
- “…त्यांनी ‘योगी चालीसा’ वाचावी”, भाजप मंत्र्याला संजय राऊतांचा सल्ला