मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात महात्मा फुले विरुद्ध लोकमान्य टिळक असा वाद चांगलाच पेटून उठलेला दिसत आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना रोखठोकच्या माध्यमातून भाष्य केले आहे. तसेच रायगडावरील शिवरायांची समाधी कोणी शोधून काढली यावर इतिहास चिवडण्याचे काम काहींनी सुरू केले आहे. ‘महात्मा फुले विरुद्ध लोकमान्य टिळक’ असा हा वाद निरर्थक आहे. शिवराय महाराष्ट्रात जन्मले हेच महत्त्वाचे, पण लोकांची मती गुंग झाली आहे, असेही राऊत म्हणाले आहेत.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘महाराष्ट्रात पुन्हा एकदा गाडलेली मढी उकरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यालाच काही जण इतिहास संशोधन असे म्हणतात. आपल्या डोळ्यांसमोर घडलेल्या घटनेबद्दल चारजण वेगवेगळी माहिती देतात हे पाहून सर वोल्टर रॅलेने लिहिलेला इतिहास जाळून टाकला किंवा पाण्यात फेकून दिला, या घटनेचा उल्लेख इतिहास संशोधक नेहमीच करीत असतात. आपल्या नजरेसमोर घडलेल्या घटनांबद्दल इतके दुमत, तर इतिहासकाळातील घटनांबद्दल कसली शाश्वती देणार, असा प्रश्न रॅलेला पडला. रॅलेला पडलेला प्रश्न आपल्या महाराष्ट्रातील इतिहास संशोधकांना का पडू नये, असा प्रश्न मला आता पडला. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा वाद आहेच. आता शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी कोणी शोधून काढली यावर ‘टिळक विरुद्ध फुले’ असा निरर्थक वाद राजकारण्यांनी सुरू केला’, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘तो वाद कमी पडला म्हणून 1992 सालात अयोध्येतील बाबरी नक्की कोणी पाडली, असा वाद भारतीय जनता पक्षाने सुरू केला. इतक्या वर्षांनंतरही श्रेयवादाचे युद्ध संपले नाही व अयोध्येत राममंदिर उभे राहिले तरी युद्ध सुरू आहे. बाबरी हिंदुत्वाच्या लाटेत उद्ध्वस्त झाली, त्या लाटेच्या शिखरावर शिवसैनिक होते. बाबरी पडली हे महत्त्वाचे. शिवाजी महाराजांचा जन्म सन 1627 मध्ये झाला असे काही इतिहासकार मानतात, तर काही इतिहास संशोधक छत्रपतींचा जन्म 1630 मध्ये झाला असे मानतात. जन्म केव्हाही झाला तरी त्यामुळे काही किरकोळ तपशिलांपलीकडे मुख्य ऐतिहासिक चरित्रात फरक पडत नाही. मुळात शिवाजीराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला हे महत्त्वाचे. जन्म-तिथीचा अनिश्चितपणा अनाठायी आहे.’
महत्वाच्या बातम्या:
- “धर्म, जातीतून बाहेर पडल्यानंतर…” ; सोनू सूदची भोंगा प्रकरणावर प्रतिक्रिया
- IPL 2022 PBKS vs RR : राजस्थान इज बॅक..! वानखेडेवर पंजाब किंग्जला हरवलं; मुंबईकर खेळाडू चमकला!
- IPL 2022 : “आई फक्त तुझ्यासाठी…” स्पेशल जर्सी घालून मैदानात उतरले लखनऊचे खेळाडू; पाहा VIDEO!
- IPL 2022 LSG vs KKR : केएल राहूल शून्यावर OUT..! लखनऊचं कोलकाताला १७७ धावांचं आव्हान
- IPL 2022 LSG vs KKR : लखनऊ ऑन टॉप..! कोलकाताचा तब्बल ७५ धावांनी उडवला धुव्वा