संजय काकडे भाजप सोबत राहणार नाहीत, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

टीम महाराष्ट्र देशा- 2014 प्रमाणे देशामध्ये नरेंद्र मोदी यांची लाट राहिलेली नाही. लाटेत आता पाणी देखील नसल्याची टीका शिवसेना खा. संजय राऊत यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे सहयोगी खा. संजय काकडे हे भेटले तेंव्हा त्यांनी देशातले वातावरण भाजपला पोषक नसून पक्ष 150 च्यावर जाईल हे दिसत नाही, तसेच आपण भाजपसोबत राहणार नसल्याचं काकडे यांनी सांगितल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे.

सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या रोखठोक या लेखामध्ये संजय राऊत यांनी भाजपला निशाणा बनवतानाच देशात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते असे भाकीत व्यक्त केले आहे. भारतीय जनता पक्षाने देशभरात 80 ते 100 जागा गमावल्या तर चित्र काय असेल यावर आजपासून खलबते सुरू आहेत. मधल्या काळात अचानक भाजपच्या घोडय़ावर स्वार झालेले खासदार संजय काकडे दिल्लीत भेटले. भाजपबरोबर राहणार नाही असे ते म्हणाले. त्यामुळे वारे उलट्या दिशेने वाहू लागल्याचं दिसून येत आहे असं राऊत यांनी म्हंटल आहे.

पुढे राऊत लिहितात, काकडे हे खासगी संस्थांमार्फत निवडणुकांची सर्वेक्षणे करीत असतात व अनेकदा त्यांचा ‘आकडा’ बरोबर येतो हे पुणे महापालिकेत दिसले. देशातले वातावरण भाजपला पोषक नाही व भाजप 150 च्या वर तरी जाईल काय अशी शंका असल्याचं काकडे म्हणाले होते.